
हिंदी चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार, चतुरस्त्र अभिनय आणि वैशिष्ट्यपूर्ण संवादफेक यांसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra Health Update) यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सोमवारी त्यांची प्रकृती अचानक खालावली होती, त्यामुळे काही काळ त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले. मात्र, मंगळवारी सकाळी व्हेंटिलेटर काढण्यात आला आणि त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा दिसत आहे. कुटुंबीय आणि चाहत्यांसाठी ही निश्चितच दिलासादायक बातमी आहे. दरम्यान, धर्मेंद्र यांच्याविषयी वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर असतात.

'अँग्री यंग मॅन' ते रोमँटिक हिरो, धर्मेंद्र यांनी हिंदी सिनेसृष्टीला अनेक दशके आपल्या अभिनयाने समृद्ध केले. पण त्यांचे खरे वैशिष्ट्य होते ते त्यांचा स्वभाव आणि मैत्रीला दिलेले स्थान. याच मैत्रीच्या जोरावर त्यांनी हिंदी सिनेसृष्टीच्या व्यस्त शेड्युलमध्येही एका मराठी चित्रपटासाठी वेळ काढला होता आणि ते फक्त एका गाण्यासाठी!

ज्येष्ठ सिनेसमीक्षक दिलीप ठाकूर यांनी उलगडलेली ही आठवण खूपच प्रेरणादायी आहे. मुंबईतील चांदिवली स्टुडिओचे मालक हेमंत कदम हे धर्मेंद्र यांचे जिवलग मित्र. सुपरस्टार होऊनही धर्मेंद्र यांनी या मैत्रीला कधीच कमी लेखले नाही. त्या काळात हिंदीचे आघाडीचे नायक मराठी किंवा छोट्या चित्रपटांत काम करणे टाळत असत, पण या सगळ्याला धर्मेंद्र अपवाद ठरले. हेमंत कदम यांच्या 'हिचं काय चुकलं' या मराठी चित्रपटातील 'घेऊन टांगा सर्जा निघाला, दूर धन्याचा गाव, अरे तू धाव...' हे गाणे शूट करण्यासाठी त्यांनी दोन पूर्ण दिवस दिले. या गाण्यात त्यांनी मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीचे दिग्गज अभिनेते विक्रम गोखले यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली.

हे गाणे त्या काळात प्रचंड गाजले. धर्मेंद्र यांनी काम केल्यामुळे चित्रपटाला विशेष प्रसिद्धी मिळाली आणि मराठी प्रेक्षकांनाही त्यांचा हा खास सूर आणि स्टाइल पाहायला मिळाला. चांदिवली स्टुडिओत दोन दिवस चाललेले हे शूटिंग आजही अनेकांसाठी एक मैत्रीची अनमोल आठवण आहे.

'हिचं काय चुकलं' हा चित्रपट 1985 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन नंदकुमार काळे यांनी केले होते, तर संगीत राम लक्ष्मण यांचे होते. गाण्याचे बोल सुधीर मोग यांनी लिहिले होते. हे गाणे आजही मराठी संगीतप्रेमींमध्ये लोकप्रिय आहे. धर्मेंद्र यांनी या गाण्यात पारंपरिक मराठी वेशभूषा परिधान केली होती, ज्यामुळे त्यांचा मराठी संस्कृतीबद्दलचा आदर दिसून आला. विक्रम गोखले यांच्यासोबत त्यांची केमिस्ट्री या गाण्यात विशेष लक्षवेधी ठरली.

धर्मेंद्र यांच्या या कृतीने मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीमधील दरी कमी करण्याचा एक सुंदर प्रयत्न झाला. आजही अशा मैत्रीच्या गोष्टी ऐकून नव्या पिढीला प्रेरणा मिळते. धर्मेंद्र यांना सध्या रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांची प्रकृतीत लवकरात लवकर सुधारावी अशी चाहते देवाकडे प्रार्थना करताना दिसत आहेत.