
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री दीपिका कक्करला मे महिन्यात लिव्हर स्टेज २च्या कॅन्सरचे निदान झाले. त्यानंतर ती सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना तिच्या प्रकृतीविषयी माहिती देत होती. पण, जेव्हा सुरुवातीला दीपिकाला लिव्हर कॅन्सरची काही लक्षणे जाणवली तेव्हा तिने त्याकडे दुर्लक्ष केले होते. नेमकं कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं चला जाणून घेऊया...

दीपिकाने नुकत्याच शेअर केलेल्या व्लॉगमध्ये म्हटले की, "आज मी पूर्ण दिवस विश्रांती घेतली कारण मला खूप उदास वाटत होते. साइट इफेक्ट्स तर आहेत, पण त्याची सवय झाली आहे. फक्त केस गळणे खूप भयानक आहे. खूप जास्त केस गळत आहेत. जेव्हा मी आंघोळ करून येते, तेव्हा 10 ते 15 मिनिटे शांत बसते, कोणाशीही बोलत नाही. कारण केस इतके जास्त गळतात. हे माझ्यासाठी खूप भयानक आहे."

दीपिका ने तिच्या चाहत्यांना पुढे सांगितले की, अलीकडेच तिची ट्यूमर मार्कर टेस्ट आणि यकृत कार्य चाचणी (LFT) झाली होती. त्याचे रिपोर्ट्स नॉर्मल आले होते. डॉक्टरांनी सध्या FAPI स्कॅन न करण्याचा सल्ला दिला आहे आणि सांगितले आहे की, दोन महिन्यांनंतर ही तपासणी करुया.

दीपिकाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर करून सांगितले होते की, सुरुवातीला तिला पोटदुखीची तक्रार जाणवत होती. जेव्हा ती रुग्णालयात गेली, तेव्हा तिला कळले की तिच्या यकृतामध्ये टेनिस बॉलच्या आकाराचा ट्यूमर आहे. अहवालांमधून स्पष्ट झाले की हा स्टेज-2 कर्करोग आहे. दीपिका आणि तिचा पती शोएब इब्राहिम यांनी चाहत्यांना समजावले की, पोटदुखी सारख्या किरकोळ समस्याही मोठ्या आजाराचा संकेत असू शकतात, म्हणून वेळीच डॉक्टरकडे तपासणी करून घ्या.

यकृत कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे अनेकदा लोक दुर्लक्ष करतात. यामध्ये, सतत पोटदुखी, विशेषतः उजव्या वरच्या भागात, पोटात किंवा आजूबाजूला सूज येणे, भूक कमी लागणे आणि लवकर पोट भरल्यासारखे वाटणे, कोणतेही कारण नसताना वजन कमी होणे, नेहमी थकवा आणि अशक्तपणा जाणवणे, मळमळ किंवा उलटीची समस्या, कावीळसारखी लक्षणे जाणवणे आहेत.