
आजकाल अनेकांना डोळे उघडल्याबरोबर उशीशेजारी असलेला फोन पाहण्याची सवय असते. व्हॉट्सॲप मेसेज, इन्स्टाग्राम रिल्स किंवा ई-मेल्स तपासल्याशिवाय अनेकांचा दिवस सुरू होत नाही. पण ही छोटीशी सवय तुमच्या संपूर्ण दिवस खराब करु शकते.

झोपेतून उठल्यावर आपला मेंदू संथ गतीने काम करायला सुरुवात करतो. अशातच अचानक फेसबुक, व्हॉट्सॲप किंवा बातम्या पाहिल्याने मेंदूवर माहितीचा प्रचंड भडिमार होतो. यामुळे दिवसभर डोकं जड वाटणे किंवा चिडचिड होणे असे प्रकार घडतात.

सकाळी उठल्याबरोबर फोन पाहिल्याने तुमचा मेंदू स्वतःच्या कामाचा विचार करण्याऐवजी इतरांच्या मेसेजला उत्तर देण्यात किंवा रिल्स पाहण्यात व्यस्त होतो. यामुळे दिवसभर कोणत्याही एका कामात मन लागत नाही.

आपण रात्रभर अंधारात शांत झोपतो. त्यामुळे डोळ्यांवरील ताण कमी झालेला असतो. पण सकाळी उठल्यानंतर लगेच फोन घेतल्याने अचानक मोबाईलचा प्रखर प्रकाश डोळ्यांवर पडतो. त्यामुळे डोळ्यांना थकवा जाणवतो. तसेच डोळे चुरचुरू लागतात.

मोबाईलवर एखादा चुकीचा मेसेज किंवा नकारात्मक बातमी वाचली की दिवसाची सुरुवातच टेन्शनने होते. यामुळे तुम्हाला दिवसभर उत्साही वाटण्याऐवजी मानसिकदृष्ट्या थकल्यासारखे वाटते.

यामुळे सकाळी उठल्यावर किमान अर्धा ते एक तास फोनला हात लावू नका. मोबाईल ऐवजी कोमट पाणी प्या. थोडा वेळ व्यायाम किंवा योगा करा. तसेच घरच्या लोकांशी गप्पा मारा.