Talcum Powder Hacks : डाग घालवते, दुर्गंधी कमी आणि केसही चमकदार.. टॅल्कम पावडर एक, फायदे अनेक
आपलं शरीर ताजंतवानं रहावं, घामाचा वास येऊ नये यासाठी बहुतांश लोकं टॅल्कम पावडरचा वापर सर्रास करतात. पण त्याचा वापर तेवढ्यासाठी फायदेशीर नाही तर याच टॅल्कम पावडरचा वापर तुम्ही इतर गोष्टींसाठीही करू शकता. घ्या जाणून भन्नाट फायदे...

उन्हाळ्यात जवळजवळ प्रत्येक घरात टॅल्कम पावडर वापरली जाते. घाम जावा, फ्रेश वाटावं, शरीराची दुर्गंधी कमी व्हावी यासाठी बहुतेक लोकं टॅल्कम पावडर वापरतात. पण टॅल्कम पावडरचा उपयोग केवळ त्वचेच्या काळजीपुरता मर्यादित नाही. तिच्या मदतीने दैनंदिन जीवनातील अनेक लहान समस्या सहजपणे सोडवता येतात. विशेषतः उन्हाळ्यात, या पावडरच्या काही स्मार्ट ट्रिक्स खूप उपयुक्त ठरू शकतात.

केसांसाठी ड्राय शॅम्पूसारखा उपयोग : उन्हाळ्यात केस घामट होतात, लवकर तेलकट होतात आणि चिकट दिसतात. जर रोज शॅम्पू करणे शक्य नसेल, तर टॅल्कम पावडर उपयुक्त ठरू शकते. टाळूवर थोडी पावडर लावून ब्रशने हळुवारपणे विंचरल्याने अतिरिक्त तेल शोषले जाते आणि केस पुन्हा फ्रेश व चमकदार दिसू लागतात. ( All Photo Credit Source: Social Media)

कपड्यांवरील तेलाचे डाग काढण्यासही उपयुक्त : कपड्यांवर पडलेले तेलाचे जिद्दी डाग काढणं खूप कठीण असतं. अशा परिस्थितीत, डागावर लगेच टॅल्कम पावडर टाकावी. ही पावडर तेल शोषून घेते, ज्यामुळे कपडे धुण्यास सोपे जातात आणि डागही फिका होतो.

बुटांची दुर्गंधी होते कमी : उन्हाळ्यात बऱ्याच लोकांच्या पायांना जास्त घाम येतो, ज्यामुळे बुटांना दुर्गंधी येऊ लागते. बुटांच्या आत थोडी टॅल्कम पावडर टाकून ती रात्रभर ठेवल्याने ओलावा आणि दुर्गंधी दोन्ही कमी होतात.

घट्ट कपडे घातल्यावर होणार इरिटेशन होतं कमी : स्किनी जीन्स किंवा घट्ट ड्रेस घालताना त्वचेशी घर्षण होते, तिथे लाल होणं, त्वचेला रॅश येणं असे त्रास होता. त्यामुळे असे कपडे घालण्यापूर्वी त्या भागाला थोडी टॅल्कम पावडर लावल्यास, असे कपडे घातल्यावर होणार त्रास कमी होतो, ते चिकटत नाहीत आणि त्वचेवर पुरळ येण्याची शक्यताही कमी होते.

वाळू आणि बारीक केस काढण्यासाठी उपयुक्त: जेव्हा तुम्ही समुद्रकिनारा किंवा धबधब्यासारख्या ठिकाणी जाता, तेव्हा वाळू शरीराला चिकटते. टॅल्कम पावडर लावून ब्रशने घासल्यास वाळू सहजपणे निघून जाते. याशिवाय, केस कापल्यानंतर मानेवर किंवा चेहऱ्यावर चिकटलेले बारीक केस काढण्यासाठीही पावडर लावण्याची युक्ती खूप प्रभावी आहे.

या प्रकारे टॅल्कम पावडर वापरल्याने फक्त फ्रेशच वाटत नाही तर रोजच्या आयुष्य़ातील अनेक समस्याही सोप्या आणि लगेच सुटतात. ( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)