
सुसंस्कृत डोंबिवलीच्या नागरिकांसाठी ही बातमी आश्चर्यचकित करणारी आहे. गेल्या वर्षभरापासून डोंबिवली रेल्वे स्थानकाचे कोट्यवधी रुपयांचे नूतनीकरणाचे काम सुरू आहे. स्टेशनला एक नवा लूक मिळत आहे, वाढीव जिने, सरकते जिने, शेड्स उभारले जात आहेत. पण हे सुशोभीकरण इतके प्रभावी ठरले आहे की, खुद्द 'डोंबिवली' हे मूळ नावच स्थानकाच्या प्रवेशद्वारांवरून गायब झाले आहे!

डोंबिवलीला मिळालेल्या उपमा, जसे की नाट्यनगरी, क्रिडानगरी, साहित्यनगरी या नावांच्या कमानी सर्व ८ प्रवेशद्वारांवर झळकत आहेत, पण 'डोंबिवली' नावाचा साधा उल्लेखही नाही. यामुळे बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना आपण नक्की कोणत्या स्टेशनवर आहोत, याचा मोठा गोंधळ होत आहे.

या गंभीर प्रकारानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमोद गोपीनाथ कांबळे यांनी रेल्वे प्रशासनाला निवेदन देत मूळ नाव त्वरित लावावे आणि रेंगाळलेली कामे पूर्ण करावी अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा थेट इशारा दिला आहे. तर ‘डोंबिवली’ हे मूळ नावच कुठेच दिसत नसल्याने स्थानकाचं नूतनीकरण आणि सुशोभीकरण करताना रेल्वे प्रशासनानं जणू ‘ओळख’च मिटवली आहे.त्यामुळे नागरिक आणि प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे!

डोंबिवली रेल्वे स्थानक गेल्या वर्षभरापासून नूतनीकरणाच्या कामामुळे चर्चेत आहे.प्लॅटफॉर्म रुंदीकरण, वाढीव जिने, सरकते जिने, शेड — अशा अनेक सुविधा आता येथे दिल्या गेल्या आहेत.मात्र, या नूतनीकरणामध्ये रेल्वे प्रशासनाने डोंबिवलीचं मूळ नावच गायब केलं आहे, हे पाहून नागरिक अचंबित आहेत.पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही बाजूंस मिळून स्थानकाला एकूण आठ प्रवेशद्वार (गेट) आहेत. परंतु या आठही प्रवेशद्वारांवर कुठेही “डोंबिवली” असा शब्द लिहिलेला नाही.त्याऐवजी — नाट्यनगरी, नृत्यनगरी, क्रीडा नगरी, साहित्य नगरी, उद्योग नगरी, संगीत नगरी, एकता नगरी आणि कला नगरी अशी उपनावे लावण्यात आली आहेत.

ही उपमा डोंबिवलीकरांच्या कर्तृत्वाला साजेशी असली, तरी नागरिकांचा प्रश्न एकच डोंबिवलीचं नाव कुठे गेलं?या विषयावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी विभागप्रमुख प्रमोद गोपीनाथ कांबळे यांनी मुंबई विभागीय रेल्वे व्यवस्थापक हिरेश मीना यांची भेट घेतली आणि औपचारिक निवेदन सादर केलं.या वेळी वरिष्ठ मंडळ विद्युत अभियंता शांतीलाल यांच्याशीही चर्चा करण्यात आली.

या वेळी जर स्थानकाबाहेरील कमानीवर ‘डोंबिवली’ हे मूळ नाव लवकरात लवकर लिहिले गेले नाही,तर आम्ही शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडू असा इशारा शिवसेनेने उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून रेल्वे प्रशासनाला देण्यात आला आहे गेल्या वर्षी स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण यांनी या नूतनीकरणाचं लोकार्पण केलं होतं,

मात्र आता प्रवाशांना स्टेशनचं नावच न दिसल्यामुळे गोंधळ उडतोय.बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना “हे नक्की डोंबिवली स्टेशनच आहे का?” असा प्रश्न पडतो,आणि त्यांना स्थानिकांकडे विचारपूस करत स्टेशनपर्यंत यावं लागतं.डोंबिवली म्हणजे सुसंस्कृत नगरी! कला, साहित्य, उद्योग, संगीत — सगळं इथं आहेच…पण या सर्व गोष्टींचं मूळ नाव म्हणजे डोंबिवली — आणि तेच आता हरवलं आहे! असे मत स्थानक परिसरात येणाऱ्या प्रवासी व्यक्त करत आहे .