
डोळे हे आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचे आणि संवेदनशील इंद्रिय आहे. अनेकदा आपल्याला डोळे फडफडण्याचा अनुभव येतो. कधी कधी काही सेकंद, तर कधी कधी एक ते दोन मिनिटांपर्यंत डोळे फडफडतात, ही एक सामान्य बाब आहे.

मात्र, या डोळे फडफडण्यामागे शुभ आणि अशुभ अशा दोन्ही प्रकारची कारणे जोडली आहेत.

विशेष म्हणजे, स्त्री आणि पुरुष यांच्या डोळ्यांच्या फडफडण्यावरून त्याचे वेगवेगळे अर्थ लावले जातात.

सामुद्रिक शास्त्रामध्ये याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. अनेकदा डोळा फडफडत असेल तर ही घटना शुभ की अशुभ असा प्रश्न आपल्या मनात येतो.

वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार डोळ्याची फडफड होणे हे चांगले आणि वाईट अशा दोन्ही प्रकारच्या घटनांचे संकेत देते. भविष्यात घडणाऱ्या काही घटनांची पूर्वसूचना आपल्याला याद्वारे मिळते.

शास्त्रानुसार, जर एखाद्या पुरुषाचा उजवा डोळा किंवा पापणी फडफडत असेल, तर ते अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे पुरुषांना भविष्यात मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते.

जर एखाद्या पुरुषाचा उजवा डोळा फडफडत असेल तर त्यांची अनेक अडलेली कामे मार्गी लागतात. त्यांना कामाच्या ठिकाणी बढती मिळण्याची शक्यता असते. त्यांच्यावर लक्ष्मीची कृपा होते आणि धनलाभ होतो.

याउलट, जर पुरुषांचा डावा डोळा फडफडत असेल, तर त्यांना भविष्यात मोठ्या संकटांचा सामना करावा लागू शकतो. त्यांच्या सुखात अडचणी येण्याची किंवा शत्रू वाढण्याची शक्यता असते.

पण, स्त्रियांच्या बाबतीत ही गोष्ट नेमकी उलट आहे. जर एखाद्या स्त्रीचा उजवा डोळा किंवा पापणी फडफडत असेल, तर ते अत्यंत अशुभ मानले जाते. यामुळे त्यांना भविष्यात येणाऱ्या एखाद्या वाईट बातमीची किंवा संकटाची चाहूल लागते. तसेच काहीतरी अप्रिय घटना घडण्याची शक्यता वर्तवली जाते.

जर एखाद्या महिलेचा डावा डोळा किंवा डाव्या डोळ्याची पापणी फडफडत असेल, तर तिला लवकरच मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते. त्यांची अनेक रखडलेली कामे पूर्ण होतात. त्यांना नोकरीत बढती मिळते, असे मानले जाते.

वैज्ञानिकदृष्ट्या डोळे फडफडण्याची कारणे वेगळी आहेत. जेव्हा डोळ्यांवर जास्त ताण येतो किंवा पुरेशी झोप मिळत नाही, त्यामुळेही डोळे फडफडतात.

मनात तणाव असतो किंवा स्क्रीन टाइम जास्त असतो, तेव्हा डोळ्यांची जलद उघडझाप होते. यामुळे डोळ्यांच्या स्नायूंमध्ये समस्या निर्माण होऊन डोळे फडफडण्याची समस्या उद्भवू शकते. तसेच डोळ्यांसंबंधित इतर त्रासांनाही सामोरे जावे लागते. त्यामुळे डोळ्यांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे