कट्टर वैरी पुन्हा एकत्र !, राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांची अनोखी भेट, इंदापूर कोर्टात ‘चाय पे चर्चा….
राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही. कधी काळी मित्र असलेले नंतर पुन्हा आपआपला मार्ग वेगळे झालेले हे दोन मित्र आज पुन्हा एकत्र आले. निमित्त होते कोर्टाच्या तारखेचे...हे मित्र आहेत राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत !

स्वाभिमानीचे शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्यातील राजकीय वैर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. एकेकाळी मित्र असणारे हे दोन्ही नेते आता एकमेकांच्या विरोधात आहेत. मात्र, हे दोन्ही नेते आज चक्क एकमेकांना भेटून चहाचा आनंद घेताना पाहायला मिळाले.त्यामुळे त्यांच्या भेटीची चांगलीच चर्चा सुरु झाली आहे.

यापूर्वीही राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर न्यायालयात तारखांच्या निमित्ताने एकत्र आले होते. शेतकरी संघटनेच्या आंदोलनांच्या तारखेसाठी एकत्र आलेल्या या दोघा मित्रांनी त्यावेळी मात्र एकमेकांकडे पाहणे देखील टाळले होते.

पण आज त्यांनी पु्न्हा एकत्र येत एका टेबलावर चहा घेत जुन्या आठवणींना उजाळा दिला.त्यामुळे राजकारणातील हे कट्टर वैरी चहाच्या निमित्ताने तरी एकत्र आल्याने उपस्थितांमध्ये एकच कुतूहल निर्माण झाले.

2011 मध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनातून राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातून इंदापूर न्यायालयामध्ये या संदर्भातील खटला सुरू आहे, या खटल्याच्या निमित्ताने हे दोन्ही नेते तब्बल 14 वर्षांनंतर इंदापूरच्या न्यायालयात एकत्रित आले. त्यानंतर दोघांनीही एकत्रित न्यायालयामध्ये हजेरी लावली.

त्यानंतर या दोघा जुन्या मित्रांनी चहाचा अस्वाद घेत 'चाय पे चर्चा' देखील केली. मात्र, ही भेट केवळ 'जुन्या आठवणींना उजाळा' देणारी असल्याचे त्यांनी सांगितले.आंदोलनाच्या काळात आम्ही एकत्र होतो. खटला एकच असल्याने आज भेट झाली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही आजही एक आहोत,अशी प्रतिक्रिया दोघांनीही दिली. या दोन मातब्बर नेत्यांच्या या दिलखुलास भेटीने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.