
जनावरेही जखमी, मदतीची मागणी : कामाजी जाधव यांनी शेतातील गोठ्यामध्ये शेती साहित्यासह जनावरे बांधली होती. दरम्यान, आगीचे लोट वाढत गेल्याने बांधलेली जनावरेही यामध्ये जखमी झाली आहेत. दावणीत बैलांना बांधल्यामुळे त्यांना हालचालच करता आली नाही. त्यामुळे जनावरे जखमी झाली असून उपचारासाठी आता आर्थिक मदतीची मागणी शेतकऱ्याने केली आहे.

बैलही जखमी आणि बारदाण्याचेही नुकसान : या दुर्घटनेत जाधव यांचे बैल तर जखमी झाले आहेतच. पण बारदाणाही जळाला आहे. त्यामुळे आता मशागतीची कामे आणि खरिपातील पेरणी करावी कशी असा सवाल कामाजी यांच्यासमोर आहे. त्वरीत नुकसानभरपाई देण्याची मागणी जाधव यांनी केली आहे.

शेती साहित्याची राखरांगोळी : जनावरांना बांधण्याबरोबरच शेतीचे साहित्यही सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीकोनातून जाधव यांनी गोठा उभारला होता. मात्र, बुधवारी झालेल्या दुर्घटनेत शेती औजारे, पेरणी यंत्र आणि साठवलेले धान्य याची राखरांगोळी झाली आहे. त्यामुळे आता मशागतीची कामे आणि खरिपाची पेरणी करावी कशी असा सवाल आहे.

शॉर्टसर्किटने गोठ्याला आग : सध्या ग्रामीण भागात अनियमित विद्युत पुरवठा होत आहे. यातच सांगवी शिवारात अचानक उच्च दाबाने विद्युत पुरवठा झाल्याने जाधव यांच्या गोठ्यामध्ये शॉर्टसर्किट झाले. यामुळे अवघ्या काही वेळात गोठ्याला आग लागली. नियंत्रित वीज पुरवठ्यामुळे ही आग लागल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे. दुष्काळात तेरावा अशीच स्थिती या शेतकऱ्याची झाली आहे.