
'स्त्री 2', 'भेडिया' आणि 'मुंज्या' यांसारख्या यशस्वी हॉरर कॉमेडी चित्रपटांनंतर मॅडॉक फिल्म्सने हा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. मॅडॉकने आतापर्यंत दिलेल्या हिट चित्रपटांमुळे 'थमा'बद्दल प्रेक्षकांच्या खूपच अपेक्षा होत्या. दर्जेदार चित्रपट देणाऱ्या याच फ्रँचाइजीचा भाग असल्यामुळे 'थमा'ला चांगला प्रतिसाद मिळतोय.

दिवाळीचा सिझन हा अनेक चित्रपटांसाठी फायदेशीर ठरतो. हेच आयुषमानच्या 'थमा'च्या बाबतीत घडलंय. या चित्रपटाने अवघ्या काही दिवसांतच 100 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. दिवाळी सुट्ट्यांचा या चित्रपटाला चांगला फायदा झाला आहे.

सध्या लोककथा मोठ्या पडद्यावर दाखवण्याचा ट्रेंड सुरू आहे. 'थमा'मध्येही याच जॉनरच्या कथेला दाखवण्यात आलं आहे. यामध्ये रक्त पिणाऱ्या व्हॅम्पायर्सची कथा दाखवण्यात आली आहे. अनोखी आणि रंजक कथा या चित्रपटाच्या यशमागचं एक कारण आहे.

आयुषमान खुराना, रश्मिका मंदाना, परेश रावल आणि नवाजुद्दीन सिद्दीक यांसारख्या कलाकारांच्या दमदार अभिनयामुळेही 'थमा'ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. याशिवाय सहाय्यक कलाकारांनीही उत्तम कामगिरी केली आहे.

'मुंज्या' आणि 'स्त्री 2'सोबतच 'थमा'मध्ये 'भेडिया'चीही झलक पहायला मिळणार आहे. यामध्ये व्हॅम्पायर आलोक आणि भेडिया यांच्यात जबरदस्त फाइटिंग सीक्वेन्स दाखवण्यात आली आहे. हा सीक्वेन्स आणि ही खास झलक प्रेक्षकांना खूप आवडत आहे.