
आज आपल्या आजूबाजूला एक तरी चाहप्रेमी नक्कीच असतो. काही लोक तर वेगवेगळ्या प्रकारचे चहा पितात. लोकांची गरज लक्षात घेऊन आज बाजारात अनेक प्रकारचा चहा विकला जातो. ग्रीन टी, ब्लॅक टी असे चहाचे अनेक प्रकार आहेत. परंतु आता ग्रीन टीला चहा असल्याचे सांगत त्याची विक्री केल्यास चांगलीच मोठी कारवाई होऊ शकते.

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अर्थात एएसएसएआयने चहा नेमकं कोणत्या पेयाला म्हटले पाहिजे, याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. एएसएसएआयच्या नियमानुसार Camellia sinensis या झाडापासून तयार आलेल्या मिश्रणालाच चहा म्हटले जाते. अन्य कोणत्याही फुलांपासून, झाडांपासून तयार करण्यात आलेल्या पेयाला चहा म्हणू नये असे एएसएसएआयने स्पष्टपणे आपल्या आदेशात सांगितले आहे.

एएसएसएआयच्या आदेशानुसार हर्बल टी, ग्रीन टी, रुईबोस टी, फ्लावर टी यासारे पेय आता चहा म्हणून ओळखले जाणार नाहीत. बाजारात या पेयांना चहा असल्याचे सांगत विकले जात असेल तर त्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

नव्या नियमानुसार आता ग्रीन टी, कांगडा टी, इन्स्टंट टी हे पेयदेखील Camellia sinensis या झाडापासून तयार केले जात असतील तर त्यांना चहा म्हटले जाणार आहे. सोबतच Camellia sinensis या झाडापासून तयार करण्यात आलेले मिश्रण न वापरता तयार करण्यात आलेल्या कोणत्याही नावापुढे चहा लावल्यास गुन्हा ठरवला जाणार आहे.

अशा प्रकारचा गुन्हा करणाऱ्यांविरोधात थेट कारवाई केली जाणार आहे. तसेच अशा प्रकारची पेयं ही प्रोप्रायटरी फुड, नॉन स्पेसिफाईड फुड म्हणून ओळखली जाणार आहेत. या नियमांचे उल्लंघन केल्यास फुड सेफ्टी अँड स्टँडर्ड अॅक्ट 2006 अंतर्गत कारवाई केली जाणार आहे.