
सध्या सोशल मीडियावर एका मराठमोळ्या अभिनेत्रीचं नाव तुफान चर्चेत असून ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून गिरीजा ओक आहे. एक्स (ट्विटर) आणि इन्स्टाग्रामवर ती सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. मालिका, चित्रपट, नाटक, ओटीटीवरून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री गिरीजा 'न्यू नॅशनल क्रश' होताना दिसतेय.

गिरीजाने नुकतीच एक मुलाखत दिली होती आणि त्यावेळी तिने निळ्या रंगाची कॉटनची साडी नेसली होती. त्यावर तिने पांढऱ्या रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज घातला होता. तिचा हा अत्यंत साधा पण तितकाच लक्षवेधी आणि आकर्षून घेणारा लूक सोशल मीडियावर विशेष चर्चेत आहे.

गिरीजाच्या सहज साध्या अंदाजावर नेटकरी फिदा झाले आहेत. काहींनी तिला थेट 'नॅशनश क्रश' असं म्हटलंय. मराठी, हिंदी आणि कन्नड चित्रपटांमध्ये गिरीजाने आजवर काम केलंय. 'कांतारा : चाप्टर वन' फेम अभिनेता गुलशन देवैय्यासोबत ती लवकरच 'थेरपी शेरपी' या वेब सीरिजमध्ये झळकणार आहे.

गिरीजाने शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटातदेखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. त्यानंतर ती ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या 'इन्स्पेक्टर झेंडे' या चित्रपटात मनोज वाजपेयीच्या ऑनस्क्रीन पत्नीच्या भूमिकेत दिसली. गिरीजाने आजवर अनेक दर्जेदार प्रोजेक्ट्समध्ये काम केलंय.

गिरीजाचं नैसर्गिक सौंदर्य, तिचा बोलण्याचा अंदाज आणि साधा पेहराव नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधून घेतलंय. म्हणूनच ती सध्या सोशल मीडियावर 'नॅशनल क्रश' ठरतेय. तिची साधी आणि आकर्षक छबी तरुणाईला भुरळ घालतेय. इन्स्टाग्रामवरील तिचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढत आहे.