
जळगावच्या सराफा बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरामध्ये 1 हजार 200 रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल 6 हजार रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 31 हजार 325 रुपयांवर तर चांदीचे दर जीएसटीसह 1 लाख 77 हजार 160 रुपयांवर पोहोचले, गेल्या चार दिवसात सोन्या दरात चार हजार तर चांदीच्या दरात तब्बल 16 हजार रुपयांची वाढ झाली आहे.

लग्नसराई मध्ये सोन्या-चांदीच्या दरात होत असलेल्या वाढीमुळे वऱ्हाडी मंडळींना खिशाला कात्री बसली आहे. येत्या काही दिवसात दोन्ही धातुच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे अनेक जण अगोदरच सोन्याची खरेदी करून ठेवत आहेत.

फेडरल बँकेचे व्याजदर कमी होणार असल्याने नागरिकांच्या गुंतवणुकीचा कल सोन्याकडे वाढल्याने परिणाम सोन्या-चांदीच्या दरावर झाल्याचे सर्व व्यवसायिकांनी सांगितले. नवीन वर्षात सोन्यापेक्षा चांदी अधिक चमकणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. काहींच्या मते चांदी दोन लाखांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे.

आगामी काळात सोन्याच्या आणि चांदीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता सराफा व्यवसायिकांनी व्यक्त केली आहे. सध्या मौल्यवान धातुच्या खरेदीसाठी ग्राहकांची लगबग वाढली आहे. दरवाढ झाल्यास अतिरिक्त खर्च टाळण्यासाठी आताच खरेदी करण्यात येत आहे.

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक ८९५५६६४४३३ या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.