
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठे चढऊतार पाहायला मिळत आहेत. दिवाळीच्या अगोदर या दोन्ही मौल्यवान धातूंचा भाव चांगलाच वाढला होता. दिवाळीनंतर मात्र सोने आणि चांदी चांगलेच स्वस्त झाले होते.

दरम्यान, आता पुन्हा एकदा सोन्याचा तसेत चांदीचाही भाव वधारताना दिसत आहे. आज (13 नोव्हेंबर) आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी तसेच इतर काही कारणांमुळे राजधानी दिल्लीत सोन्याचा भाव थेट तीन हजार रुपयांनी वाढलाच

एका दिवसात सोन्याचा भाव 3000 रुपयांनी वाढल्यानंतर दिल्लीच्या सराफा बाजारात सोने 1,30,900 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. ऑल इंडिया सराफा असोशिएशनच्या माहितीनुसार सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचा हा भाव वाढला आहे.

बुधवारी 99.5 टक्के शुद्ध सोन्याचा भाव 1,27,300 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. आज हाच भाव वाढून 1,30,300 रुपये प्रति 10 ग्रॅमवर (सर्व कर मिळून) पोहोचला आहे. सोन्यासोबतच चांदीच्याही भावात मोठी वाढ झाली. गुरुवारी म्हणजेच 13 नोव्हेंबर रोजी चांदी तब्बल 7,700 रुपयांनी वाढून थेट 1,69,000 रुपये प्रति एक किलोवर (सर्व कर मिळून) पोहोचली.

बुधवारी चांदीचा हाच भाव 1,61,300 रुपये प्रति किलो होता. दरम्यान, सध्या सोने आणि चांदीचा भाव वाढताना दिसत आहे. त्यामुळे लोकांना दागिने करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. भविष्यातही सोने, चांदीमध्ये अशीच तेजी राहणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.