
केस गळण्याची समस्या पुरुष आणि महिला या दोघांमध्ये पहायला मिळते. आधी फक्त वयोवृद्ध लोकांमध्ये केस गळणे, टक्कल येणं अशा समस्या असायच्या. हल्ली तर विशी-तिशीतल्या लोकांनाही टक्कल पडल्याचं दिसून येतं. पुरुषांमध्ये केस गळण्याच्या समस्येला 'मेन्स पॅटर्न बाल्डनेस' म्हटलं जातं.

क्रिकेटर मोहम्मद शामी, युट्यूबर एल्विश यादव, निर्माते बोनी कपूर यांसारख्या सेलिब्रिटींचं हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या डॉक्टर अरीका बंसल यांनी केस गळण्याबाबत एका पॉडकास्टमध्ये सांगितलंय.

डॉ. अरीका यांना या पॉडकास्टमध्ये विचारलं गेलं की पुरुषांमध्ये केस गळण्यामागचं किंवा कमी वयात टक्कल पडण्यामागचं कारण 'जेनेटिक्स'शिवाय अजून काय असू शकतं? यात आनुवंशिक हेच प्रमुख कारण असू शकतं का?

या प्रश्नाचं उत्तर देताना डॉ. अरीका म्हणाल्या, "फक्त पुरुषांबद्दल बोलायचं झाल्यास, आनुवंशिकता हे प्रमुख कारण असू शकतं. मी असं म्हणेन की पुरुषांमध्ये टक्कल पडण्याचं मुख्य कारण 80 टक्के हे जेनेटिक्सच असतं. म्हणजेच जर तुमचे वडील किंवा कुटुंबातील इतर व्यक्तींना टक्कल पडलं असेल, तर तुम्हालाही त्याचा सामना करावा लागू शकतो."

"80 टक्के प्रकरणांमध्ये फॅमिली हिस्ट्री पॉझिटिव्ह दिसली. तर 20 टक्के लोकांमध्ये फॅमिली हिस्ट्री नसतानाही जेनेटिक्स चेंजेस आणि म्युटेशनमुळे त्यांना टक्कल पडल्याचं दिसून आलं", असंही त्या पुढे म्हणाल्या.

"ज्या महिलांमध्ये केस गळण्याचं प्रमाण अधिक आहे, त्यांच्याबाबत जेनेटिक्स हे फारसं कारणीभूत नसतं. महिलांमध्ये डाएट म्हणजेच खाण्यापिण्याच्या सवयी आणि ताणामुळे केस गळण्याची समस्या निर्माण होऊ शकते. "