‘सैराट’मुळे प्रकाशझोतात आली 400 वर्षांपूर्वीची हत्ती बारव; ही विहिर पाहण्यासाठी कधी प्लॅन करताय?
रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'सैराट' या चित्रपटानंतर राज्यभरात 96 पायऱ्यांची ही विहिर खूप प्रसिद्ध झाली. तब्बल 400 वर्षे जुनी ही विहिर तिच्या अद्वितीय वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे.

अहमदनगर इथल्या कमलादेवी मंदिर परिसरात हत्ती बारव हे ठिकाण आहे. नागराज मंजुळेंच्या 'सैराट' या चित्रपटानंतर राज्यभर या 96 पायऱ्यांची विहिर खूप प्रसिद्ध झाली.

या ठिकाणी मुख्य मंदिरासमोर शेतात एक भव्य असा बारव असून चिरेबंदी दगडापासून बनवलेल्या बारवाची खोली सात पुरुष म्हणजे शंभर फूट आहे. हत्ती बारव हे ठिकाण अहमदनगर शहरापासून अंदाजे 10 किलोमीटर अंतरावर आहे.

ही विहिर तिच्या अद्वितीय वास्तुकलेसाठी आणि ऐतिहासिक महत्त्वासाठी प्रसिद्ध आहे. मध्ययुगीन काळात बांधलेली ही पायरी विहिर त्याकाळी महत्त्वाचा जलस्रोत म्हणून काम करायची.

या बारवेवर हत्तीची मोट चालायची असं म्हटलं जातं. ही बारव 400 वर्षांपूर्वीची आहे. निजामशाहीच्या काळात शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी तिचा वापर व्हायचा.

या बारवजवळ चक्क हत्तींचा वापर करून मोटेनं पाणी उचललं जायचं. मग दगडी पन्हाळीने ते एका चेंबरमध्ये घेऊन तिथून खापरी नळांच्या जोडणीतून नगर शहराला पाणी पुरवलं जायचं. त्याकाळी पाणी खेचण्यासाठी हत्तींचा वापर केला जात असे, म्हणून तिला हत्ती बारव म्हटलं जातं.