
काल दिवसभर रिमझिम कोसळणाऱ्या पावसाने आज सकाळपासूनच जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईला पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी भरले असून रेल्वे रुळावरही पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे.

सकाळपासून मुंबईत धुवाधार पावसाने सुरुवात केली. त्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पावसाचे पाणी भरले. सायन पुलाखाली प्रचंड पाणी साचले आहे. तसेच सायनपासून ठाण्याकडे जाणारे रस्तेही पाण्याखाली गेले आहेत.

मुंबई पाऊस (प्रातिनिधिक फोटो)

अंधेरी फाटक आणि सबवेमध्ये पावसाचे पाणी भरले आहे. या भागात गुडघ्यापर्यंत पाणी आल्याने गाड्यांमध्येही पाणी शिरताना दिसत आहे.

अंधेरी सबवेमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी पोलीस तैनात ठेवण्यात आले आहेत. तसेच बीकेसी कोविड सेंटर येथेही गुडघाभर पाणी साचले आहे. हा संपूर्ण परिसर जलमय झाल्याने नागरिकांना घाणेरड्या पाण्यातूनच लसीकरणासाठी जावं लागत आहे.

दरम्यान, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर जोरदार वारे वाहणार आहेत. त्याचा परिणाम म्हणून पुढील चार ते पाच दिवस राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडणार आहे. रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत चार दिवस रेड अॅलर्ट घोषित करण्यात आला आहे. तर मुंबई, ठाण्यासाठी रविवारी रेड अॅलर्ट जारी करण्यात आल्याचं मुंबई हवामान विभागाचे उपसंचालक के. एस. होसळीकर यांनी सांगितलं.