अप्सरेपेक्षाही सुंदर, गर्दीपासून दूर, शांत आणि निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे हिल स्टेशन, एकदा बघाल तर…
गर्दीपासून दूर, शांत आणि निसर्गाच्या कुशीत वेळ घालवायचा असेल तर भारतातील सर्वात सुंदर आणि परफेक्ट हिल स्टेशन. एकदा भेट दिली तर पुन्हा-पुन्हा येण्याची होते इच्छा.

जर तुम्हाला देखील आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत एखाद्या हिल स्टेशनला भेट देयची असेल तर भारतातील सर्वात सुंदर, शांत आणि गर्दीपासून दूर असणारे हे हिल स्टेशन आहे एकदम परफेक्ट. आताच प्लॅन करून ठेवा.

मंगळुरूजवळच वसलेलं ‘सकलेशपूर’ हे एक निसर्गरम्य आणि कमी प्रसिद्ध असलेलं हिल स्टेशन सध्या पर्यटकांचं लक्ष वेधून घेत आहे. भारतात अनेक सुंदर पर्यटनस्थळं आहेत पण काही ठिकाणं अशी आहेत जी अजूनही फारशी गाजलेली नाहीत. त्यापैकीच एक म्हणजे सकलेशपूर.

मंगळुरू पासून सुमारे 101 किमी अंतरावर असलेलं सकलेशपूर हे कर्नाटकातील हासन जिल्हा येथे वसलेलं आहे. हिरव्यागार डोंगररांगा, धुक्याने वेढलेलं वातावरण आणि शांत निसर्गामुळे हे ठिकाण पर्यटकांना मंत्रमुग्ध करतं.

सकलेशपूर हे विशेषतः कॉफीच्या मळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथे पसरलेली हिरवीगार कॉफी बागायती आणि डोंगराळ परिसर पर्यटकांना एक वेगळाच अनुभव देतात. या परिसरात अनेक लहान तलाव आणि सुंदर धबधबे आहेत. ट्रेकिंग, फोटोग्राफी आणि शांत वेळ घालवण्यासाठी हे ठिकाण उत्तम पर्याय ठरतो.

या ठिकाणाच्या अप्रतिम सौंदर्यामुळे स्थानिक लोक सकलेशपूरला ‘कर्नाटकचं स्वित्झर्लंड’ असं संबोधतात. धुक्यात हरवलेली डोंगररांग, थंड वाऱ्याची झुळूक आणि शांत वातावरण यामुळे येथे येणाऱ्यांना एक वेगळीच अनुभूती मिळते.

सकलेशपूरमध्ये तुम्हाला विविध मसाल्यांच्या बागायती पाहायला मिळतात. येथे पर्यटक नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले, केमिकलमुक्त मसाले खरेदी करू शकतात. त्यामुळे निसर्गाचा आनंद घेतानाच शॉपिंगचीही संधी मिळते.