
'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हिना खान कॅन्सरशी झुंज देत आहे. हिनाला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या उपचारादरम्यान तिला बऱ्याच गोष्टींचा त्रास सहन करावा लागतोय.

कॅन्सरच्या रुग्णांवर केल्या जाणाऱ्या केमोथेरपीमुळे त्यांचे केस गळतात. यामुळे केमोथेरपी सुरू असताना हिनाने आधीच टक्कल केलं होतं. यानंतर हळूहळू तिच्या भुवयांचेही केस गळू लागले. आता नुकत्याच एका पोस्टमध्ये हिनाने सांगितलंय की तिच्या पापण्यांचेही केस गळू लागले आहेत.

हिनाच्या पापण्यांवर फक्त एकच केस शिल्लक राहिल्याचं तिने दाखवलंय. हा फोटो शेअर करत तिने आपलं दु:ख चाहत्यांसमोर मांडलंय. या कठीण परिस्थितीला हिना अत्यंत हिंमतीने सामोरी जात आहे.

या पोस्टमध्ये हिनाने लिहिलंय, 'जेनेटिकली माझ्या पापण्यांचे केस खूप लांब आणि सुंदर होते. या शूर, एकट्या योद्ध्याने म्हणजेच माझ्या पापणीच्या या अखेरच्या केसाने माझ्यासोबत ही लढाई लढली आहे. माझ्या केमोथेरपीच्या शेवटच्या सायकलजवळ पोहोचल्यानंतर पापणीचं हे एक केस मला प्रेरणा देत आहे.'

हिनाने या पोस्टमध्ये असंही सांगितलंय की तिने जवळपास एक दशकभरापेक्षा अधिक काळ डोळ्यांवर खोटे आयलॅशेस लावले नव्हते. मात्र आता शूटनिमित्त तिला खोटे आयलॅशेस लावावे लागतील.