
सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. हिंदू धर्मात विवाह म्हणजे केवळ दोन व्यक्तींचे मिलन नसून अनेक अर्थपूर्ण परंपरांचा सोहळा असतो. हिंदू विवाह संस्कारांमध्ये गृहप्रवेश हा सर्वात महत्त्वाचा आणि भावनिक क्षण असतो. या विधीदरम्यान नववधू तांदळाचा कलश ओलांडते आणि घरात प्रवेश करते.

पण हा विधी नेमका का केला जातो, यामागे काय शास्त्र असते, असा प्रश्न अनेकांना पडतो. नववधूने तांदळाचा कलश ओलांडण्यामागे अनेक धार्मिक, सांस्कृतिक आणि प्रतीकात्मक अर्थ दडलेले आहेत.

लग्नानंतर जेव्हा वधू पहिल्यांदा तिच्या सासरच्या घरी प्रवेश करते, तेव्हा प्रवेशद्वारावर तांदळाने भरलेला एक कलश (माप) ठेवला जातो. नववधू आपल्या उजव्या पायाने या कलशाला हलकासा धक्का देऊन तो कलश घरात ओतते. यानंतर ती घरात प्रवेश करते. या विधीमागे हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाच्या श्रद्धा दडलेल्या असतात.

हिंदू संस्कृतीत नववधूला सासरच्या घरी देवी लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. ज्याप्रमाणे देवी लक्ष्मी घरात धन-धान्य आणि ऐश्वर्य घेऊन येते, त्याचप्रमाणे वधूच्या शुभ पावलांमुळे सासरच्या घरात सुख, समृद्धी आणि भरभराट यावी, यासाठी हा विधी केला जातो.

तांदूळ हे अन्न, संपत्ती आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते. वधू तांदळाचा कलश घरात ओतते, याचा अर्थ असा लावला जातो की तिच्या आगमनाने हे घर कधीही अन्न, संपत्ती आणि आनंदापासून वंचित राहणार नाही.

हा विधी म्हणजे केवळ एक परंपरा नाही, तर नववधूला घराची गृहलक्ष्मी म्हणून सन्मानित करण्याचा एक मार्ग असतो. ती आता केवळ एक नवीन सदस्य नाही, तर समृद्धी आणि शुभतेचा स्रोत बनली आहे असे यातून दर्शवण्याचा प्रयत्न केला जातो.

यामुळेच हिंदू विवाह संस्कृतीत गृहप्रवेशाच्या वेळी नववधूने तांदळाचे माप ओलांडणे हे केवळ एक धार्मिक कार्य नसून नवीन वधूच्या आगमनाने घरात येणाऱ्या सकारात्मक ऊर्जा आणि संपूर्णतेचे एक सुंदर आणि शुभ प्रतीक मानले जाते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)