OTT: शापित हॉस्टेलच्या खोलीत दडलंय भयानक रहस्य; ओटीटीवर या चित्रपटाचा धुमाकूळ
एकाच वेळी रहस्य, थरार आणि भीतीचा अनुभव घेण्याची इच्छा असणाऱ्या प्रेक्षकांना हा सिनेमा पाहता येईल. तुम्हालाही हॉरर चित्रपटांची आवड असेल आणि काहीतरी वेगळं पाहायचं असेल, तर नेटफ्लिक्सवरील हा चित्रपट तुमच्या वॉचलिस्टमध्ये नक्कीच असू शकतो.

ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर आठवड्याला वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होत असतात. मात्र, काही चित्रपट रिलीज होताच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतात. सध्या असाच एका हॉरर थ्रिलर चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये चर्चा रंगवली आहे. विशेष म्हणजे, हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होताच ट्रेंडिंगच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. या चित्रपटाचं नाव आहे '418'.
एका शापित हॉस्टेलची रहस्यमयी कथा या चित्रपटात पाहायला मिळते. त्यामुळे हॉरर चित्रपटांची आवड असणाऱ्यांसाठी हा सिनेमा खास ठरू शकतो. '418' हा मूळचा तेलुगू चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा कर्नाटकातील एका मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमधील 418 क्रमांकाच्या खोलीभोवती फिरते. या खोलीशी संबंधित अनेक रहस्यमयी आणि भयावह घटना घडत असतात.
ही खोली शापित असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे या खोलीत जाणाऱ्या व्यक्तींना कोणत्या विचित्र अनुभवांना सामोरं जावं लागतं, हे चित्रपटात पाहायला मिळतं. हॉस्टेल, तिथलं वातावरण आणि एका खोलीशी जोडलेलं गूढ अशा पार्श्वभूमीवर चित्रपटाची कथा पुढे सरकते.
विशेष म्हणजे, या चित्रपटात केवळ भीतीदायक प्रसंगच नाहीत, तर प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवणारं रहस्यही आहे. एकट्याने हा चित्रपट पाहणं काही प्रेक्षकांसाठी धाडसाचं ठरू शकतं. 'केजीएफ'सारख्या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शक प्रशांत नील यांनी या चित्रपटाला प्रेझेंट केलं आहे. तर दक्षिण भारतीय सिनेसृष्टीतील दिग्दर्शक कीर्तन नाडागौडा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. त्यामुळे या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
'418' हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर आता ओटीटीवर दाखल झाला आहे. 20 नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्सवर हा सिनेमा स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध झाला. रिलीज झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच या चित्रपटाने नेटफ्लिक्सच्या ट्रेंडिंग यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे सध्या ओटीटीवर या चित्रपटाची चांगलीच चर्चा सुरू आहे. या हॉरर थ्रिलर चित्रपटाची आणखी एक विशेष बाब म्हणजे त्याचं IMDb रेटिंग. '418' या चित्रपटाला IMDb वर 10 पैकी 8 रेटिंग मिळालं आहे.