Adinath Kothare: त्या सीननंतर दिग्दर्शक जोरात ओरडले..; आदिनाथ कोठारेनं सांगितला ‘रामायण’च्या सेटवरील किस्सा
Adinath Kothare: आदिनाथ कोठारेसाठी मात्र या चित्रपटातील भरताची भूमिका आणि रणबीर कपूरसोबतचा सेटवरील अनुभव कायम लक्षात राहणारा ठरला आहे.

Adinath Kothare in Ramayana: रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘रामायण पार्ट 1’ सध्या चर्चेत आहे. दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या या चित्रपटात अभिनेता आदिनाथ कोठारे भरताची भूमिका साकारत आहे. या भव्य चित्रपटाचा भाग होण्याचा अनुभव आदिनाथसाठी खास ठरला आहे. चित्रपटाच्या सेटवरील शिस्त, दिग्दर्शक नितेश तिवारी यांची बारकाईने काम करण्याची पद्धत आणि रणबीर कपूरसोबतचा एक खास प्रसंग याबद्दल आदिनाथने नुकताच खुलासा केला. पहिल्याच काही दिवसांत घडलेल्या एका प्रसंगामुळे सेटवरचा संकोच दूर झाला आणि आपण त्या टीमचा एक भाग झाल्याची भावना निर्माण झाल्याचं त्याने सांगितलं.
रणबीर कपूरने दिला खास सल्ला
‘स्क्रीन’ला दिलेल्या मुलाखतीत आदिनाथने ‘रामायण’च्या सेटवरील पहिल्या दिवसांचा अनुभव सांगितला. या चित्रपटात काम करण्याची जबाबदारी मोठी आणि भावनिकदृष्ट्या महत्त्वाची असल्याने सुरुवातीला आपण थोडा नर्व्हस होतो, असं त्याने म्हटलं. कलाकार म्हणून व्यक्तिरेखा समजून घेणं, सेटवरील वातावरणाशी जुळवून घेणं आणि इतर कलाकारांसोबत सहज होणं, या गोष्टींसाठी काही वेळ लागतो, असंही त्याने सांगितलं. एका सीनच्या रिहर्सलदरम्यान राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न हे एकत्र उभे राहून समोरच्या एका गोष्टीकडे पाहत प्रतिक्रिया देणार होते. या सीनमध्ये काहीतरी वेगळं करण्याची कल्पना आदिनाथच्या मनात आली होती. मात्र, दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या सूचनांचं पालन करण्याच्या विचाराने त्याने स्वतःहून काही बदल करण्याचं टाळलं.
अशातच शॉटच्या आधी रणबीर कपूरने त्याच्या खांद्यावर थाप मारली आणि आदिनाथच्या मनात असलेली कृती करण्याचा सल्ला दिला. रणबीरने प्रोत्साहन दिल्यानंतर आदिनाथने तसंच केलं. शॉट पूर्ण झाल्यावर नितेश तिवारी यांनी ओरडून मोठ्याने ‘गुड’ म्हणत त्याचं कौतुक केलं. हा क्षण आपल्यासाठी महत्त्वाचा ठरला, असं आदिनाथने सांगितलं. या प्रसंगामुळे सेटवरील संकोच दूर झाला आणि आपणही त्या कुटुंबाचा भाग असल्यासारखं वाटू लागलं, अशी भावना त्याने व्यक्त केली.
नितेश तिवारींच्या बारकाईने काम करण्याच्या पद्धतीचं कौतुक
आदिनाथने या चित्रपटाच्या सेटवरील शिस्तीचंही विशेष कौतुक केलं. त्याच्या मते, ‘रामायण’सारख्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये प्रत्येक गोष्टीकडे अत्यंत बारकाईने लक्ष दिलं जात होतं. दिग्दर्शक नितेश तिवारी हे अगदी छोट्या-छोट्या गोष्टींचाही विचार करतात. एखादा सीन अधिक प्रभावी व्हावा, त्यातील बारकावे योग्य पद्धतीने पडद्यावर यावेत, यासाठी ते विशेष मेहनत घेत असल्याचं आदिनाथने सांगितलं. त्यामुळे या चित्रपटाच्या सेटवर काम करताना प्रत्येक कलाकाराला आपल्या व्यक्तिरेखेबाबत आणि जबाबदारीबाबत अधिक सजग राहावं लागत होतं.
ऑडिशनमधून मिळाली भरताची भूमिका
‘रामायण’मध्ये भरताची भूमिका कशी मिळाली, याबद्दलही आदिनाथने मुलाखतीत सांगितलं. त्याच्या मते, कलाकाराचं काम कुठे ना कुठे कोणाच्या तरी नजरेत येत असतं. एखाद्या ऑडिशनमध्ये मुख्य भूमिका मिळाली नाही, तरी त्या प्रक्रियेतून केलेलं काम भविष्यात दुसऱ्या संधीचं कारण ठरू शकतं. आदिनाथने एका चित्रपटासाठी ऑडिशन दिलं होतं. प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांच्या माध्यमातून त्याची निवड प्रक्रियेसाठी शॉर्टलिस्टिंग झाली होती. मात्र, त्या चित्रपटातील मुख्य भूमिका त्याला मिळाली नाही. विशेष म्हणजे, त्या चित्रपटाची निर्मिती नितेश तिवारी करत होते. त्यावेळी नितेश तिवारी यांच्या नजरेत आदिनाथचं काम आलं असावं. त्यामुळे ‘रामायण’साठी त्याने ऑडिशन दिलं, तेव्हा दिग्दर्शकांना त्याची क्षमता आणि अभिनयाची ओळख होती, असं आदिनाथने सांगितलं.
‘तुमचं कामच तुम्हाला पुढचं काम मिळवून देतं,’ या आशयाचं मत व्यक्त करत त्याने या संधीमागचं कारण स्पष्ट केलं. त्यामुळे भरताची भूमिका मिळणं हा केवळ एका ऑडिशनचा परिणाम नसून, आधी केलेल्या कामाची दखल घेतली गेल्याचा अनुभव असल्याचं त्याच्या बोलण्यातून दिसून येतं.
