
अभिनेता हृतिक रोशनने लग्नाच्या 14 वर्षांनंतर सुझान खानला घटस्फोट दिला. बॉलिवूडमधील हा सर्वांत चर्चेतला आणि महागडा घटस्फोट ठरला होता. विभक्त झाल्यानंतर हृतिक आणि सुझान दोघं मिळून मुलांचं संगोपन करत आहेत. त्याचसोबत ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही पुढे गेले आहेत.

हृतिक सध्या अभिनेत्री सबा आझादला डेट करतोय. तर सुझान खान ही अर्सलान गोणीला डेट करतेय. घटस्फोटानंतर पूर्व पती किंवा पत्नीसोबतचं नातं चांगलं राहत नाही, असा अनेकांचा समज असतो. पण हृतिक आणि सुझानच्या बाबतीत असं काहीच घडलं नाही. घटस्फोटानंतरही त्यांच्यात चांगली मैत्री आहे.

इतकंच नव्हे तर या चौघांमध्ये खूप चांगली मैत्री झाली आहे. सबा आणि सुझान यांचंही एकमेकींसोबत चांगलं पटतं. तर हृतिक आणि अर्सलान यांनाही एकत्र पाहिलं गेलंय. बर्थडे पार्ट्यांनाही हे चौघं एकत्र येतात. यावर कुटुंबीयांची काय प्रतिक्रिया असते, असा प्रश्न अभिनेता आणि सुझानचा भाऊ झायेद खानला विचारण्यात आला.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत झायेदने हृतिक आणि सुझानच्या रिलेशनशिपवर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, "आमचं कुटुंब हे प्रसिद्ध अमेरिकन सिटकॉम मॉडर्न फॅमिलीसारखंच आहे. आम्ही सर्वजण खूप क्रेझी आहोत. एखाद्या गोष्टीचा मनमोकळेपणे स्वीकार करण्याचा समजूतदारपणा आमच्यात आहे."

"अर्थात या टप्प्यापर्यंत पोहोचायला आम्हाला थोडा वेळ लागला. पण आता आम्ही सर्वजण सोबत खुश आहोत. आम्ही सर्वजण एकत्र पार्टी करतो, मजामस्ती करतो. यात काहीच वेगळं वाटत नाही", असं झायेदने स्पष्ट केलं.