
अंडी हा प्रथिनांचा एक उत्तम स्रोत मानला जातो. वजन कमी करणे असो किंवा स्नायूंची निर्मिती, आहारात अंड्यांचा समावेश करणे अत्यंत फायदेशीर ठरते. अनेकजण वेळेअभावी सकाळीच अंडी उकडून ठेवतात. ती रात्री किंवा दुसऱ्या दिवशी खातात.

मात्र, उकडलेली अंडी किती काळ खाण्यायोग्य राहतात आणि ती साठवण्याची योग्य पद्धत काय आहे, हे जाणून घेणे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जर उकडलेली अंडी योग्यरित्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवली, तर ती ७ दिवसांपर्यंत खाण्यायोग्य राहू शकतात. मग ती अंडी सोललेली असोत किंवा कवचासह. ती साधारण ७ दिवस टिकतात.

मात्र, त्यातील पौष्टिकता आणि चव टिकवून ठेवण्यासाठी ती २ ते ३ दिवसांच्या आत खाणे केव्हाही उत्तम मानले जाते. जर अंडी हाफ बॉइल्ड किंवा सॉफ्ट बॉइल्ड असतील, तर ती साठवून न ठेवता त्याच दिवशी संपवणे हिताचे असते.

अंडी उकडल्यानंतर ती जास्त वेळ खोलीच्या तापमानाला (Room Temperature) बाहेर ठेवणे धोक्याचे ठरू शकते. अंडी उकडल्यानंतर ती लगेच थंड पाण्यात टाकावीत जेणेकरून ती लवकर थंड होतील.

अंडी उकडल्यानंतर जर तुम्ही ती खाणार नसाल, तर किमान २ तासांच्या आत ती फ्रिजमध्ये ठेवणे आवश्यक आहे. जर वातावरणात उष्णता जास्त असेल, तर १ तासाच्या आत ती फ्रिजमध्ये ठेवावीत. रेफ्रिजरेटरचे तापमान ४ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी असावे, ज्यामुळे बॅक्टेरियाची वाढ रोखली जाते.

अनेकांना वाटते की अंडी सोलून ठेवणे सोयीचे आहे, परंतु विज्ञानानुसार कवचासह अंडी साठवणे अधिक सुरक्षित असते. अंड्याचे कवच हे नैसर्गिक संरक्षणात्मक थर म्हणून काम करते, जे बाहेरील दुर्गंधी आणि बॅक्टेरियापासून अंड्याचे संरक्षण करते.

जर तुम्हाला सोललेली अंडी ठेवायचीच असतील, तर ती हवाबंद डब्यात ओल्या कापडाखाली किंवा थंड पाण्यात बुडवून ठेवावीत. यामुळे तुम्ही अंड्यांमधील पोषक तत्वांचा पूर्ण लाभ घेऊ शकता.