
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात बुद्ध पौर्णिमेला घेण्यात आलेल्या निसर्गानुभव या नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत कोर आणि बफर क्षेत्रात ५ हजार ६९ मांसभक्षी व तृणभक्षी वन्यप्राण्यांची नोंद करण्यात आली. चंद्रपूर, मूल, मोहर्ली, खडसंगी, पळसगाव व शिवणी या सहा वनपरिक्षेत्रातील गणना झाली.

गणनेत ५५ वाघ व १७ बिबटे असल्याची नोंद झाली. तसेच ४०३ चितळ, ३४४ रानगवे, ३६३ रान डुक्कर, ३४० वानर असे वन्यप्राण्यांची नोंद घेण्यात आली. या उपक्रमात १६० निसर्गप्रेमीं व ८० गाईड सहभागी झाले होते.

प्राणी गणना करण्यासाठी ताडोबा बफर क्षेत्रातील ७९ मचाण उभारण्यात आले होते. त्या ठिकाणी प्रत्येकी दोन निसर्गप्रेमींना संधी दिली होती. वन अधिकारी व क्षेत्रीय वन कर्मचाऱ्यांनी प्राणी गणना केली.

मचाणींवर १६० निसर्गप्रेमींनी क्षेत्रीय वन कर्मचाऱ्यांसोबत बसून प्राणी गणना केली. निसर्गप्रेमींसाठी ‘माय ताडोबा’ या संकेतस्थळावर निसर्ग अनुभव उपक्रमासाठी नोंदणी करण्यात आली होती.

तलावाशेजारी असलेल्या तसेच पानवठ्याच्या शेजारच्या मचाणावर बसून निसर्गप्रेमींना पाणी पिण्यासाठी आलेल्या वाघ व बिबट्याचे मनसोक्त दर्शन घेण्याचा अनुभव याचि देही याचि डोळा आला.

ताडोबामधील दोन्ही झोनमध्ये मोरांची संख्या 327 आढळून आली आहे. यात कोअरमध्ये 230 तर बफरमध्ये 97 मोर आहेत. पंखांचा पिसारा फुलवलेले मोर पाहून अनेकांचा आनंद गगणात मावेनासा झाला.

खडसंगी वन परिक्षेत्रमध्ये सर्वाधिक ५११ वन्य प्राण्यांच्या नोंदी घेतल्या गेल्या. त्यानंतर मोहुरली ४८१, मुल ३४१, शिवणी २१६, पळसगाव १२२, चंद्रपूर १४६ वन्य प्राणी नोंद घेण्यात आली.