
पावसाळ्यातील वातावरणामुळे अनेकदा फोन आणि चार्जर ओले होतात. हल्लीचे बहुतांश फोन वॉटरप्रूफ किंवा स्प्लॅशप्रूफ असल्याने ते लवकर खराब होत नाहीत, पण चार्जर ओला झाल्यास मात्र धोका असतो. अशा परिस्थितीत काय काळजी घ्यावी, याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया.

जर तुमच्या फोनचा चार्जर पावसात ओला झाला असेल, तर तो लगेच वापरू नका. ओल्या चार्जरला सॉकेटमध्ये लावल्यास शॉर्ट सर्किट होऊन आग लागण्याचा धोका असतो. तसेच यामुळे चार्जर खराब होऊ शकतो.

जर फोनचा चार्जर ओला झाल्यावर, सर्वात आधी त्याची केबल अडॅप्टरमधून वेगळी करा. अडॅप्टर आणि केबल दोन्ही स्वच्छ आणि कोरड्या कापडाने काळजीपूर्वक पुसून घ्या. यानंतर चार्जर आणि केबल कमीत कमी २४ तास मोकळ्या आणि हवेशीर ठिकाणी ठेवा. जेणेकरून त्यातील ओलावा पूर्णपणे निघून जाईल.

यानंतर चार्जरचा यूएसबी पोर्ट (USB Port) आणि केबलची पिन (Pin) नीट तपासा. त्यात ओलावा जमा होण्याची शक्यता असते. ज्यामुळे चार्जर तुमच्या फोनलाही नुकसान पोहोचवू शकतो. पोर्ट आणि पिन पूर्णपणे कोरडे असल्याची खात्री झाल्यावरच चार्जर वापरा.

ओला झालेला चार्जर लवकर सुकवण्यासाठी हेअर ड्रायरचा कधीही वापर करु नका. त्यातील जास्त उष्णतेमुळे चार्जरच्या आतील नाजूक भागांना आणि सर्किटला नुकसान होऊ शकते. चार्जर नैसर्गिकरित्या कोरडा होऊ देणे हाच सर्वोत्तम आणि सुरक्षित उपाय आहे.

पाण्यामुळे चार्जरच्या पिनला आणि पोर्टला गंज लागू शकतो. गंज लागल्यास विद्युत प्रवाह खंडित होऊ शकतो. ज्यामुळे चार्जर आणि तुमच्या फोनच्या चार्जिंग पोर्टचे नुकसान होऊ शकते. यामुळे तो कोरड्या कपड्याने आवश्यक पुसून घ्या.