लहान मुलांचे दात किडण्यापासून कसे वाचवायचे? जाणून घ्या सोप्या टिप्स
लहान मुलांचे दात किडण्यापासून वाचवण्यासाठी आणि त्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी या ५ सोप्या आणि महत्त्वाच्या सवयी नक्की लावा.

लहान मुलांमध्ये दात किडणे ही अतिशय सामान्य समस्या आहे. दात किडल्यामुळे मुलांना तीव्र वेदना होतात, हिरड्यांना सूज येते आणि कधीकधी इन्फेक्शन होऊन इतर दातही खराब होतात.

दातांची अस्वच्छता आणि जास्त गोड खाणे ही दात किडण्याची मुख्य कारणे आहेत. जर मुलांना लहानपणापासूनच तोंडाच्या आरोग्याशी संबंधित चांगल्या सवयी लावल्या, तर हा त्रास सहज टाळता येऊ शकतो. त्यासाठी काही सोप्या सवयी नक्की लावा.

मुलांना सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी दात घासण्याची सवय लावा. रात्री जेवल्यानंतर दातांमध्ये अडकलेले अन्न ब्रश केल्याने निघून जाते. तसेच, रात्री लाळ कमी तयार होत असल्यामुळे जिवाणू (Bacteria) वाढण्याचा धोका असतो, म्हणून सकाळी उठल्यावरही ब्रश करणे तेवढेच महत्त्वाचे आहे.

मुलांना काहीही खाल्ल्यानंतर पाण्याने नीट चुळ भरायची तोंड धुण्याची सवय लावा. यामुळे तोंडात अन्नाचे कण अडकून राहत नाहीत आणि दात किडत नाहीत. फक्त दात घासणे पुरेसे नाही. ब्रश केल्यानंतर जीभ साफ करणेही खूप गरजेचे आहे. जिभेच्या स्वच्छतेमुळे तोंडातून येणारी दुर्गंधी थांबते. त्यामुळे दात व हिरड्यांचे आरोग्य चांगले राहते.

चॉकलेट, कँडी, शीतपेये (Cold drinks) आणि जास्त साखरेचे दूध यांमुळे दात लवकर किडतात; विशेषतः दातांना चिकटणारे गोड पदार्थ जास्त घातक असतात. त्यामुळे मुलांना अशा गोष्टी देण्याचे टाळा आणि त्याऐवजी आरोग्यदायी, साखर नसलेले पर्याय शोधा.

मुलांचे दात आणि हाडे मजबूत होण्यासाठी त्यांच्या आहारात कॅल्शियम असणे गरजेचे आहे. यासाठी मुलांना साखर नसलेले दूध, दही, हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे आणि सुकामेवा (Dry fruits) खाण्याची सवय लावा.