
आपल्यापैकी अनेकजण रुद्राक्ष धारण करतात. रुद्राक्षाला भगवान शंकराचा आशीर्वाद मानले जाते. रुद्राक्ष हे एक असं पवित्र साधन आहे जे आपल्याला आध्यात्मिक प्रवासात मदत करते. तसेच आपल्या आयुष्यात संतुलन, शांती आणि दैवी ऊर्जा आणतं.

रुद्राक्ष धारण करणं म्हणजे काही केवळ गळ्यात लटकवणं नाही. त्याला योग्य पद्धतीने धारण केल्यास त्याची शक्ती अनेक पटींनी वाढते. जर तुम्ही पहिल्यांदाच रुद्राक्ष धारण करण्याचा विचार करत असाल, तर या काही खास गोष्टी नक्की लक्षात ठेवा.

रुद्राक्षाचा स्वभाव उष्ण असतो. त्यामुळे काहींना ते सहन होत नाही. अशा निराश होऊ नका, तुम्ही ते तुमच्या देव्हाऱ्यात ठेवू शकता किंवा जपमाळ म्हणूनही वापरू शकता. रुद्राक्ष कधीही लगेचच घालू नये. त्यापूर्वी काही गोष्टी कराव्या.

रुद्राक्ष घालण्यापूर्वी ते २४ तास शुद्ध तुपात भिजवून ठेवा. त्यानंतर त्याला गाईच्या दूधाने स्नान घाला. यानतंर गंगाजलाने धुवून स्वच्छ कापडाने पुसून घ्या. त्यानंतर ते ओवण्यासाठी कापूस किंवा रेशीम धाग्याचा वापर करा.

रुद्राक्ष घालण्यासाठी सोने किंवा चांदीचा वापर करु शकता. ते अधिक शुभ मानले जाते. त्यानंतर रुद्राक्ष हातात घेऊन १०८ वेळा शिवमंत्रांचा जप करा. यामुळे रुद्राक्ष पूर्णपणे चार्ज होऊन ते ऊर्जावान होते.

तुम्ही १०८ मणी आणि एक गुरु मणी असलेली माळ रुद्राक्ष घालण्यासाठी सर्वात उत्तम मानली जाते. जर एवढे शक्य नसेल तर २७ किंवा ५४ मण्यांची माळही तुम्ही घालू शकता. रुद्राक्ष घालण्यासाठी एक ठराविक वेळ असते.

शुभ वेळेत केलेल्या कोणत्याही कार्याचे फळ अधिक मिळते. रुद्राक्षासाठी हा नियम लागू होतो. रुद्राक्ष घालण्यासाठी सकाळी ब्रह्ममुहूर्त सर्वात चांगला असतो. सोमवार किंवा गुरुवार यासारख्या शुभ दिवशी ते धारण करणे अधिक लाभदायक ठरते.

रुद्राक्ष केवळ एक मणी नाही, तर ते एक पवित्र प्रतीक आहे. त्यामुळे त्याचे पावित्र्य जपणे महत्त्वाचे आहे. रुद्राक्षाचा नेहमी आदर करा. शौचालयात जाण्यापूर्वी ते नक्की काढून ठेवा. तसेच झोपण्यापूर्वी तुम्ही ते काढू शकता. काही जण घालून झोपतात. पण ते काढणे अधिक सुरक्षित मानले जाते.

दररोज सकाळी रुद्राक्ष घालण्यापूर्वी आणि रात्री काढण्यापूर्वी रुद्राक्ष मंत्र आणि रुद्राक्ष मूळ मंत्राचा नऊ वेळा जप करा. रुद्राक्ष धारण केल्यानंतर मांसाहारी भोजन आणि मद्यपान करणे टाळा. अंतिम संस्कारात किंवा सूतक-पातक काळात रुद्राक्ष घालू नये.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)