
जम्मू काश्मीरमधील पहलगाम पर्यटकांमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर आता भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे.

सध्या संपूर्ण जगभरात भारत-पाकिस्तान युद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना ७ मे रोजी मॉक ड्रिल घेण्याचे आदेश दिले आहेत.

देशभरातील जवळपास २९५ जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल होणार आहे. भारतात १९७१ नंतर पहिल्यांदाच मॉक ड्रिल होणार असून यादरम्यान सायरनही वाजवला जाणार आहे.

जर भारत पाकिस्तान युद्ध झाले तर नागरिकांनी स्वत:ला सुरक्षित कसे ठेवावे याचे प्रशिक्षण देण्यासाठी हे मॉक ड्रिल असणार आहे. सध्या भारतात ठिकठिकाणी या मॉक ड्रिलची तयारी केली जात आहे.

महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि नाशिक यांसह एकूण 16 शहरांमध्ये हे मॉक ड्रिल असणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्स या परिसरात रंगीत तालीम पार पडली.

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) परिसरात आज (6 मे) मॉक ड्रिलची रंगीत तालीम घेण्यात आली. यावेळी रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) आणि सिव्हिल डिफेन्सच्या जवान सहभागी होते.
