
भारतीय महिला क्रिकेट संघाने २०२५ चा महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकून आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला आहे. या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय खेळाडूंच्या कामगिरीची आणि त्यांच्या एकूण संपत्तीची चांगलीच चर्चा होत आहे. विश्वचषक जिंकल्यामुळे भारतीय संघावर पैशांचा पाऊस पडला असून आयसीसी आणि बीसीसीआयनेही त्यांना मोठ्या भेटवस्तू दिल्या आहेत. विशेष म्हणजे आता जगातील टॉप-५ श्रीमंत क्रिकेटपटूंच्या यादीत ३ भारतीय क्रिकेटपटूंच्या नावाचाही समावेश झाला आहे.

ऑस्ट्रेलियन अष्टपैलू एलिस पेरी ही जगातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटपटू असून तिची एकूण संपत्ती ११३.४ कोटी रुपये आहे. सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटपटू म्हणून ती यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.

मेग लॅनिंग ही ऑस्ट्रेलियाची माजी कर्णधार असून ती सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटपटूंमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. तिची एकूण संपत्ती सुमारे ७१.४ कोटी रुपये आहे. लॅनिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने अनेक विश्वचषक जिंकले आहेत, ज्यामुळे तिचे क्रिकेटमधील स्थान खूप मोठे आहे.

भारताची माजी क्रिकेटपटू मिताली राजने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तिची अंदाजित एकूण संपत्ती सुमारे ४० ते ४५ कोटी रुपये आहे. भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंच्या यादीत ती पहिल्या क्रमांकावर येते.

भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना ही ३३.६ कोटी रुपये संपत्तीसह चौथ्या क्रमांकावर आहे आणि तिच्या स्टायलिश लूकमुळे ती मैदानाबाहेरही नेहमी चर्चेत असते.

भारतीय महिला क्रिकेट संघाची सध्याची कर्णधार हरमनप्रीत कौर, जी तिच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखली जाते, तिची एकूण संपत्ती अंदाजे २४.३६ कोटी रुपये असून ती या यादीत पाचव्या स्थानावर आहे; तिच्या नेतृत्वाखालील अलीकडील विश्वचषक विजयानंतर तिची ब्रँड व्हॅल्यू खूप वाढली आहे.