
भारतीय रेल्वे सातत्याने प्रगती करत आहे. देशात वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावत आहे. तर बुलेट ट्रेन लवकरच धाव घेईल. लवकरच हायपरलूप ट्रेन सुद्धा या कडीत जोडल्या जाणार आहे. त्यासाठीचा 410 किमीचा ट्रॅक पण तयार झाला आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हायपरलूप ट्रॅकचा व्हिडिओ शेअर केला आहे. रेल्वेची टीम आणि आयआयटी मद्रास या दोघांनी हा ट्रॅक तयार केला आहे.

हायपरलूप ट्रेन ही एक हायस्पीड ट्रेन आहे. ती एका ट्यूब व्हॅक्यूमधून धावेल. यामध्ये चुंबकीय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. ट्यूबमध्ये ही ट्रेन ताशी 1100 ते 1200 किमी वेगाने धावणार आहे. भारतीय रेल्वे जी हायपरलूप ट्रेन विकसीत करत आहे, तिचा जास्तीत जास्त वेग 600 किमी इतका आहे. यामुळे विजेचा वापर पण कमी होईल. तर प्रदूषण पण कमी होईल.

वेगवान प्रवासामुळे वेळेची मोठी बचत होईल. वेगात ही रेल्वे बुलेट ट्रेनला पण मागे टाकेल. हायपरलूप ट्रेनचे डिझाईन असे असते की ताशी सहज 1100 किमी वेगाने धावेल. ही रेल्वे एका तासात दिल्लीत ते पाटणा हे अंतर कापेल.

देशातील पहिली हायपरलूप ट्रेन ही मुंबई ते पुणे या दरम्यान धावणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुंबई ते पुणे हे अंतर केवळ 25 मिनिटात कापता येईल. सध्या रेल्वेने या दोन शहरातील अंतर कापण्यासाठी 3 ते 4 तास लागतात. अर्थात या ट्रेनचे तिकीट हे विमान प्रवासा इतकेच असण्याची शक्यता आहे.

हायपरलूप ट्रेनमध्ये न थांबता प्रवास करता येईल. अंतर झटपट कापल्या जाणार असल्याने वेळ जाणवणार नाही. कमी वेळेत जास्त दूरचा प्रवास करता येईल. हायपरलूप ट्रेनमध्ये कुठे थांबा असण्याची शक्यता नाही. दोन शहरात थेट जावे लागेल. एका पॉडमध्ये जवळपास 24-28 प्रवासी बसू शकतील.

हायपरलूप ट्रेनची कल्पना नवीन नाही. सर्वात अगोदर 2013 मध्ये एलॉन मस्क याने ही संकल्पना मांडली होती. अमेरिकेमधील दोन शहरं लॉस एंजेलिस ते सॅन फ्रांसिसको या दोन शहरादरम्यान न थांबता झटपट प्रवासासाठी त्याने ही कल्पना मांडली होती.