
इंडिगो या प्रवासी विमान वाहतूक कंपनीच्या भोंगळ कारभाळामुळे काही दिवसांपासून हजारो प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. हजारो पर्यटक परदेशात, देशांतर्गत प्रवास करण्यासाठी विमानतळावर आल्यानंतर त्यांचे विमानोड्डाणच रद्द झाल्याचे समोर आले. त्यामुळे या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

विशेष म्हणजे या प्रवाशांना त्यांची यात्रा पूर्ण तर करता आलीच नाही. शिवाय त्यांच्या सामानाची मोठी दुर्दशा झाली. आपले सामान परत घेण्यासाठी विमानतळांवर या प्रवाशांना कित्येक तास तिष्ठत बसावे लागले. इंडिगो प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे प्रवाशांना या सगळ्या अडचणी आल्या.

दरम्यान, आता प्रवाशांना आलेल्या या अडचणींची दखल घेत इंडिगो या विमानवाहतूक कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. या कंपनीने तीन ते पाच डिसेंबरपर्यंत विमानप्रवासात अडचण आलेल्या सर्व प्रवाशांना 10 हजार रुपयांचे व्हाऊचर जाहीर केले आहे. हे एक ट्रॅव्हल व्हाऊचर असेल.

विशेष म्हणजे या व्हाऊचरची मुदत 12 महिन्यांपर्यंत असेल. इंडिगो विमानाने प्रवास करताना प्रवाशांना या व्हाऊचरचा वापर करता येईल. झालेल्या चुकीनंतर आता प्रवाशांसाठी इंडिगो विमान कंपनीने हे व्हाऊचर देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या-ज्या प्रवाशांचे विमानोड्डाण रद्द झाले त्या प्रवाशांना त्यांच्या तिकिटाचे पैसेही परत दिले जात आहे. त्यासाठीची प्रक्रिया चालू करण्यात आली आहे.

दरम्यान तीन ते पाच डिंसेबर या काळात इंडिगो विमान वाहतूक कंपनीचे हजारो विमानोड्डाण रद्द झाले. त्यामुळे मोठाच गजहब उडाला होता. विशेष म्हणजे इंडिगोच्या या गलथान कारभारामुळे इतर विमान वाहतूक कंपन्यांचा विमानप्रवास चांगलाच महागला होता.