
शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारताने वेस्ट इंडिज विरुद्ध वनडे मालिका जिंकली. पहिल्या वनडे प्रमाणे दुसरा वनडे सामनाही रोमांचक होता. भारताने 2 विकेट आणि 2 चेंडू राखून विजय मिळवला. भारत एकवेळ हा सामना गमावणार असं वाटलं होतं. पण शेवटच्या ओव्हर पर्यंत चाललेला हा सामना टीम इंडियाने जिंकला.

भारताच्या या रोमांचक विजयाचा हिरो अक्षर पटेल आहे. योग्य वेळी त्याला सूर गवसला आहे. त्याने चेंडू आणि बॅट दोघांनी कमाल दाखवली. आधी त्याने 4.44 इकॉनमीने गोलंदाजी करताना 1 विकेट घेतला. त्यानंतर 35 चेंडूत नाबाद 64 धावा फटकावल्या. अक्षरने 27 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. भारताला शेवटच्या 10 षटकात विजयासाठी 100 धावांची गरज असताना त्याने ही आक्रमक फलंदाजी केली.

सर्व ऑर्डर मधला एक-एक फलंदाज चालला, हे टीम इंडियाच्या विजयाचं दुसरं प्रमुख कारण आहे. टॉप, मिडल आणि लोअर ऑर्डर मधला एक-एक फलंदाज चालला, त्यामुळे संघावर दबाव वाढला नाही. टॉप ऑर्डर मध्ये शुभमन गिलने 43 धावा केल्या. श्रेयस अय्यरने 63 आणि त्यानंतर संजू सॅमसनने 54 धावा केल्या. त्यानंतर लोअर ऑर्डर मध्ये अक्षर पटेल सर्व कसर भरुन काढली.

पहिल्या वनडे प्रमाणे दुसऱ्यावनडेतही मोहम्मद सिराजने चांगली कामगिरी केली. दुसऱ्यावनडेत त्याला विकेट मिळाली नाही. पण त्याने जास्त धावा दिल्या नाहीत. त्याने 10 षटकात 4.60 च्या इकॉनमीने गोलंदाजी केली. त्याने 10 षटकात 46 धावा दिल्या. दीपक हुड्डाने सुद्धा 4.66 च्या इकॉनमीने 42 धावा देऊन 1 विकेट काढली. त्याने बॅटिंग करताना 33 धावा केल्या.

दुसऱ्या वनडेत भारताच्या बेंच स्ट्रेंथची परिपक्वता दिसून आली. शुभमन गिल, संजू सॅमसन, दीपक हुड्डा, मोहम्मह सिराज यांनी वेस्ट इंडिज विरुद्धच्या दोन वनडे सामन्यात दबावाच्या प्रसंगात आपण कसं खेळू शकतो, ते दाखवून दिलं. गिलने पहिल्या वनडेत 64, दुसऱ्या वनडेत 43 धावा केल्या. सॅमसननेही अर्धशतक फटकावलं. भारताच्या या विजयात आयपीएलचा अनुभवही महत्त्वपूर्ण ठरला. जेव्हा आम्ही मोठ्या क्राऊड समोर खेळतो, तेव्हा देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएल मध्ये आमची तयारी झालेली असते, असं शिखर धवनने सांगितलं अक्षर पटेलने आयपीएल मध्ये सुद्धा अशी कामगिरी अनेकदा केली आहे.