
आपण रोज इंग्रजीचे अनेक शब्द वाचतो आणि बोलतो. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की, इंग्रजी भाषेत असे कोणते अक्षर आहे जे सर्वात जास्त वेळा वापरले जाते? संशोधकांच्या मते, इंग्रजी वर्णमालेतील २६ अक्षरांपैकी एक अक्षर असं आहे, ज्याच्याशिवाय ही भाषा पूर्ण होणे जवळजवळ अशक्य आहे.

इंग्रजीमध्ये सर्वात जास्त वापरले जाणारे ते अक्षर म्हणजे E. आपण जे काही लिहितो किंवा बोलतो, त्यातील प्रत्येक १०० अक्षरांमध्ये किमान १२ वेळा E हे अक्षर येतेच. हे अक्षर इंग्रजी भाषेचा कणा मानले जाते. E नंतर T आणि A या अक्षरांचा सर्वाधिक वापर होतो.

इंग्रजीतील सर्वात The हा शब्द सर्वात जास्त वापरला जातो. या शब्दाच्या शेवटी 'E' येतो. तसेच 'He', 'She', 'Me', 'We' यांसारखे छोटे पण महत्त्वाचे शब्द E मुळेच तयार होतात.

जेव्हा आपण शब्दांचे अनेकवचन करतो (Boxes) किंवा भूतकाळाबद्दल बोलतो (Liked, Played), तेव्हा 'E' अक्षराचा वापर करावाच लागतो. इंग्रजीतील अनेक शब्दांच्या शेवटी 'E' असतो (Home, Name). जरी त्याचा उच्चार स्पष्ट होत नसला, तरी शब्दाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी तो गरजेचा असतो.

जुन्या काळी गुप्त संदेश वाचण्यासाठी तज्ज्ञ एक शक्कल लढवायचे. संदेशात जे चिन्ह सर्वात जास्त वेळा आले आहे, त्याला 'E' समजून ते कोड सोडवायचे. यामुळे कठीण गुपिते उघड करणे सोपे व्हायचे.

'E' अक्षराशिवाय इंग्रजी लिहिणे खूप कठीण आहे. पण अर्नेस्ट व्हिन्सेंट राईट नावाच्या लेखकाने १९३९ मध्ये एक कमाल केली. त्यांनी 'Gadsby' नावाची ५० हजार शब्दांची पूर्ण कादंबरी लिहिली.

विशेष म्हणजे या संपूर्ण पुस्तकात त्यांनी एकदाही 'E' हे अक्षर वापरले नाही. या प्रकारच्या लेखनाला 'लिपोग्राम' असे म्हणतात आणि आजही हे साहित्यातील एक मोठे आश्चर्य मानले जाते.

थोडक्यात सांगायचे तर, E हे अक्षर इंग्रजी भाषेचा असा अविभाज्य भाग आहे की त्याशिवाय भाषेचा डोलारा उभा राहणे कठीण आहे. हेच या अक्षराचे वेगळेपण आणि भाषेतील त्याचे अढळ स्थान सिद्ध करते.