
सनरायजर्स हैदराबादने स्टार बोलर भुवनेश्वर कुमारच्या जागेवर पृथ्वी राज यारा या गोलंदाजाला संधी दिली आहे. याबाबत सनरायजर्स हैदराबादने मंगळवारी (6 ऑक्टोबर) औपचारिक घोषणा केली.

चेन्नई सुपर किंग्जस विरुद्धच्या सामन्यात भुवनेश्वर कुमारला रनअप दरम्यान दुखापत झाली. यामुळे भुवनेश्वरला आपल्या कोट्यातील चौथी ओव्हर पूर्ण करता आली नाही. आयपीएलच्या 14 व्या मोसमात भुवनेश्वरला फक्त 4 सामनेच खेळता आले.

आंध्रप्रदेशचा पृथ्वी राज यारा हा डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. पृथ्वीने वयाच्या 19 व्या वर्षी डोमेस्टिक क्रिकेटला सुरुवात केली. 22 वर्षीय पृथ्वीने आतापर्यंत केवळ 3 टी 20 सामने खेळले आहेत. आयपीएलच्या 12 व्या मोसमात पृथ्वी कोलकाताकडून दोन सामन्यात खेळला होता.

या दोन सामन्यात पृथ्वीला केवळ 1 विकेट घेण्यास यश आले होते. पृथ्वीने याआधी आंध्रप्रदेशकडून झारखंड विरुद्ध टी 20 सामना खेळला आहे. तसेच आंध्रप्रदेशकडून 11 फर्स्ट क्लास सामनेही खेळले आहे. यात पृथ्वीने 39 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 9 लिस्ट ए मॅचमध्ये 15 विकेट्स घेण्याची कामगिरी पृथ्वीने केली आहे. पृथ्वी हा डेथओव्हर स्पेशालिस्ट बोलर आहे.