
आयपीएलच्या 14 व्या मोसमातील 23 वा सामना आज 28 एप्रिलला खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने भिडणार आहेत. चेन्नई हा सामना जिंकून विजयी पंच लगावण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहेत. तर हैदराबादसमोर चेन्नईचा विजयी रथ रोखण्याचे आव्हान असणार आहे.

आयपीएलच्या इतिहासात उभयसंघ एकूण 14 वेळा आमनेसामने उभे ठाकले आहेत. यापैकी 10 सामन्यांमध्ये चेन्नईने बाजी मारली आहे. तर फक्त 4 वेळा हैदराबादला विजय मिळवता आला आहे. आकडेवारीनुसार चेन्नई हैदराबादवर वरचढ आहे.

गत मोसमात दोन्ही संघ 2 वेळा भिडले होते. त्यावेळेस दोन्ही संघांनी प्रत्येकी 1 सामना जिंकला होता.

चेन्नईकडून हैदराबाद विरुद्ध सुरेश रैनाने सर्वाधिक 415 धावा चोपल्या आहेत. तर ड्वेन ब्राव्होने सर्वाधिक 17 विकेट्स मिळवल्या आहेत.

तसेच चेन्नई विरुद्ध हैदराबादकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नरने 348 धावा चोपल्या आहेत. तसेच भुवनेश्वर कुमारने चेन्नईच्या 8 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे.