
आयपीएल 2024 मध्ये सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या सीएसकेने मोठा निर्णय घेतला आहे. माही आता चाहत्यांना कॅप्टन म्हणून दिसणार नाही. सीएसके संघाचं कर्णधारपद महाराष्ट्राचा स्टार खेळाडू ऋतुराज गायकवाड याच्याकडे असणार आहे. सीएसकेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर याबाबत माहिती देण्यात आली.

एम एस धोनीच्या नेतृत्त्वामध्ये 2010, 2011, 2018, 2021 आणि 2023 मध्ये सीएसकेने आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. सीएसके आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांनी सर्वाधिक ट्रॉफी जिंकल्या आहेत. आता धोनी कोणत्या भूमिकेत दिसणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

ऋतुराज गायकवाड 2019 मध्ये या संघात सामील झाला आणि तेव्हापासून तो 1797 धावांसह CSK साठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे आणि त्याने जिंकलेल्या सामन्यांमध्ये सर्वाधिक 1245 धावा केल्या आहेत. यामध्ये 14 अर्धशतके आणि 1 शतक केलं आहे.

ऋतुराज कॅप्टन झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. ऋतुराजकडे कर्णधारपद देण्याचा निर्णय एमएस आणि फ्लेम (प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग) यांच्यातील होता. फ्रँचायसी म्हणून आम्ही सर्व निर्णय हे टीम मॅनेंजटवर सोपवले आहेत. या निर्णयाबद्दलची माहिती आम्हाला सकाळी देण्यात आली. त्यांनी घेतलेल्या निर्णय टीमच्या हिताचाच असणार त्यामुळे आम्हीही तो मान्य केल्याचं सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी सांगितलं.

यंदाच्या हंगामातील पहिला सामना हा सीएसकेचाच आहे. ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्त्वात आरसीबीविरूद्ध सीएसके संघ उतरणार आहे.