
रॉयस चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात हा सामना होणार आहे. आजचा सामना नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबादमध्ये संध्याकाळी साडे सात वाजता सुरू होईल.

आरसीबी आणि राजस्थान सामन्यामध्ये जो जिंकेल त्या संघाचा सामना सनरायजर्स हैदराबादसोबत असणार आहे. हैदराबादचा कोलकाता नाईट रायडर्स संघाने पराभव करत फायनल गाठली. आता आरसीबी आणि राजस्थान यांना दोन सामन्यात विजय मिळवावच लागणार आहे.

आजच्या सामन्याला काही तासांचा अवधी बाकी असताना विजय माल्याने विराट कोहलीबाबत ट्विट केलं आहे. त्यामध्ये कोहलीला 2008 मध्ये खरेदी करताना आतून वाटलं होतं की, यापेक्षा चांगली निवड असू शकत नाही. आताही त्याला असंच काहीतरी वाटत असल्याचं त्याने म्हटलं आहे.

ज्यावेळी मी आरसीबीसाठी विराटवर बोली लावून त्याला खरेदी केलं आतून वाटलं होतं की यापेक्षी चांगली निवड असू शकत नाही. आताही मला आतून असं वाटत आहे की आरसीबी यंदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे, असं विजय माल्ल्या ट्विटमध्ये म्हणाला.

आरसीबी संघाने आतापर्यंत नऊवेळा क्वालिफाय केलं आहे. मात्र त्यांना एकदाही फायनल गाठता आली नाही. आजच्या सामन्यात विराट कोहलीकडे टी-20 क्रिकेटमधील 8000 धावांचा टप्पा गाठण्याची संधी असून तो फक्त २९ धावा दूर आहे.