
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात पतीने आपल्या पत्नीचा खून केला आहे. चारित्र्याच्या संशयावरून हे दृष्कृत्य केल्याचे बोलले जात आहे. या घटनेनंतर पाचोरा तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात आज पहाटे एक खळबळजनक घटना घडली.खुशाल भदाणे या तरुणाने कौटुंबिक वादातून आपली पत्नी प्रियंका भदाणे हिची चाकूने गळा चिरून आणि पोटात वार करून निर्घृण हत्या केली. प्रियंका हिचा जागीच मृत्यू झाला.

ही घटना आज (20 जुलै) पहाटे घडली. मला वाचवा, मला वाचवा, असा आरडाओरडा ऐकू आल्याने परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, पती खुशाल भदाणे यानेदेखील गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्याचा जीव वाचवण्यात आला.

खुशाल भदाणे याने पत्नीचा खून नेमका का केला? हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक माहितीवरून चारित्र्याचा संशय यामागचे कारण असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलीस निरीक्षक राहुल पवार यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे पाचोरा तालुका हादरून गेला आहे. दरम्यान, खुशाल आणि प्रियंकाला दोन मुलं असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.