
जळगावच्या अमळनेर येथील एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.मुलाचे लग्न जमवून देईल ,पैसे दुप्पट करून देईल आणि जमिनीतून सोन्याचे दागिने काढून देण्यासह वेगवेगळ्या कारणांसाठी महिलेने एका कुटुंबाकडून वेळोवेळी पैसे उकळले. ही एकूण रक्कम जवळपास 18 लाख रुपये आहे. कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसात धाव घेतली आहे. नेमकं काय घडलं? चला जाणून घेऊया…
नेमकं प्रकरण काय?
अमळनेर शहरातील बंगाली फाईल परिसरात राजेंद्र नारायण माळी यांचे कुटुंब राहात आहे. त्यांच्या मुलाचे गेल्या काही वर्षांपासूव लग्न जमत नव्हते. याच गोष्टीचा फायदा मंगलाबाई बापू पवार या महिलेने घेतला. राजेंद्र माळी यांनी केलेल्या तक्रारीनुसार, त्यांची आई महादेव मंदिरात पूजा करण्यासाठी गेली. तेथे त्यांची मंगलबाई यांच्याशी भेट झाली. मंगलाबाईंनी त्यांच्या अंगात मोगरा देवीचा वास असल्याचे सांगितले. तसेच माळी कुटुंबावर लक्ष्मी नाराज असल्यामुळे मुलाचे लग्न जमत नसल्याची थाप मारली. तसेच लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पूजा करावी लागेल. या पूजेसाठी 25 हजार रुपये लागितल असे देखील म्हटले.
राजेंद्र यांच्या आईने घडलेला प्रकार घरी सांगितला. त्यानंतर मंगलाबाईंना घरी पूजेसाठी बोलावले. तुमच्या घरामागे कानबाईची मूर्ती आणि सोन्याच्या घागरी आहेत. त्या काढण्यासाठी साडेचार लाख रुपये द्यावे लागतील असे म्हटले. माळी कुटुंबीयांनी त्यांच्यावर विश्वास ठेवता आणि दुसऱ्या दिवशी पैसे दिले. हे पैसे मंगलाबाईंनी धान्याच्या कोठडीत ठेवत असल्याचे सांगितले. हे करत असताना त्यांनी घरातील इतर सदस्यांना बाहेर काढून त्या खोलीचे दार बंद केले. असे त्यांनी दोन ते तीन वेळा केले. एकूण 14 लाख रुपये मंगलाबाईंनी उकळले होते. चौथी घागर काढताना त्या जेव्हा आत गेल्या तेव्हा मुलाने आरशामधून पाहिले की मंगलाबाईंनी पैसे साडीमध्ये लपवते.
गुन्हा दाखल
माळी कुटुंबाने काही दिवसांनंतर धान्याच्या कोठडीत जाऊन ठेवलेले पैसे शोधण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांना फेब्रुवारी ते जून महिन्यादरम्यान घडलेल्या या घटनेत फसवणुकीची खात्री झाल्यावर माळी कुटुंबाने अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मंगलाबाई बापू पवार यांच्या विरोधात जादूटोणा कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे