
मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभा राहिला आहे. मनोज जरांगे पाटील हे आज जालन्यातील अंतरवली सराटी गावात विराट सभा घेणार आहेत. या सभेसाठी लाखोंच्या संख्येने मराठा बांधव दाखल झाले आहेत.

मराठा बांधव मोठ्या संख्येने अंतरवली सराटी गावात दाखल झाले आहेत. नजर जाईल तिथंपर्यंत केवळ लोकच लोक दिसत आहेत. मराठा आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, अशी भूमिका या मराठा बांधवांनी घेतली आहे.

अंतरवली सराटीत होणाऱ्या या सभेसाठी महाराष्ट्रभरातून लोक आहेत. त्यामुळे या मराठा बांधवांच्या गाड्यांच्या पार्किंगसाठी 400 एकरची व्यवस्था करण्यात आली आहे. सभास्थळापासून 5 किलोमीटर अंतरावर गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

अंतरवली सराटी गावात आज दुपारी 12 वाजता मनोज जरांगे पाटील यांची सभा सुरु होणार आहे. या सभेत मनोज जरांगे पाटील काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

या सभेआधी मनोज जरांगे यांनी टीव्ही 9 मराठीशी बातचित केली. यावेळी माझं सरकारला एकच सांगणं आहे की, आता आमचा अंत पाहू नका. मराठा समाजाला तातडीने आरक्षण द्या, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे.