
कल्याण परिसरातील तरुणांना नशेच्या आहारी ढकलणाऱ्या अवैध कोडीनयुक्त कफ सिरप (कोरेक्स) च्या विक्रीवर कल्याण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

कल्याण पोलीस उपायुक्त, परिमंडळ ३ यांच्या विशेष पथकाने आणि बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्तपणे धडक कारवाई करत, एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे.

मोहम्मद मताब अनिस रईस असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून तब्बल ४०० कोरेक्सच्या बाटल्यांसह सुमारे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथक बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीत अमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत गस्त घालत होते.

त्यावेळी फोर्टीज हॉस्पिटल परिसरात एक इसम काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून संशयास्पद वस्तू घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी त्याला थांबवून तपासणी केली असता, त्याच्याकडे हा ४०० कोरेक्स बाटल्यांचा मोठा साठा आढळून आला.

यावेळी पोलिसांनी ४०० कोरेक्सच्या बाटल्या ज्याची अंदाजित किंमत ४ लाख इतकी आहे. त्यासोबतच काळ्या रंगाची मोटारसायकल ६०,००० किंमत त्यासोबतच ३,६६० रोख रक्कम असा एकूण ४,६३,६६० किंमतीचा माल जब्त केला आहे.

आरोपी मोहम्मद रईस याच्यावर बाजारपेठ पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्ट कलम ८(क), २२(ब)(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या आरोपीवर याआधीही एमएफसी पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विक्रीचे गुन्हे दाखल आहेत.

हा आरोपी सराईत असल्याने आणि मोठ्या प्रमाणात साठा सापडल्याने, यामागे मोठे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता आहे. पोलीस आता आरोपीची कसून चौकशी करत असून, या रॅकेटच्या मुळापर्यंत जाण्याचा तपास सुरू आहे. दरम्यान कल्याणमधील तरुणांना नशेच्या विळख्यातून वाचवण्यासाठी ही कारवाई अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.