
कल्याणमधील रिंग रोड परिसरातील रहिवाशांना गेल्या दोन महिन्यांपासून महावितरणच्या निष्काळजी कारभारामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. भुयारी केबल टाकण्यासाठी खोदलेले रस्ते अद्यापही अर्धवट अवस्थेत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी, खड्डे आणि चिखलाच्या समस्येने नागरिक त्रस्त झाले आहेत. यामुळे केवळ प्रवाशांनाच नाही तर स्थानिक रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

महावितरणने रोनक सिटी परिसरातील रिंग रोडवर भुयारी केबल टाकण्यासाठी सुमारे दोन महिन्यांपूर्वी रस्ता खोदण्यास सुरुवात केली होती. मात्र, हे काम वेळेत पूर्ण न झाल्याने सध्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे, मातीचे ढिगारे आणि चिखल साचला आहे.

या अर्धवट कामामुळे हा मुख्य मार्ग वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. ज्यामुळे अनेक छोटे-मोठे अपघात घडत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

या अर्धवट कामामुळे रोनक सिटी परिसरातील रिंग रोडवर नेहमीच वाहतूककोंडी होते. विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी शाळा, कॉलेजला जाणारे विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाला याचा मोठा फटका बसत आहे. खड्डे आणि चिखलामुळे प्रवासाला अधिक वेळ लागतो. तसेच वाहनचालकांना सतत अपघाताची भीती असते.

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, महावितरण केवळ खोदकाम करून सोडून देते आणि काम पूर्ण करण्याची जबाबदारी घेत नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. महावितरणच्या या भोंगळ कारभारावर स्थानिक प्रशासनही दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.

महावितरण आणि स्थानिक प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. महावितरणने तातडीने हे काम पूर्ण करून रस्ता पूर्ववत करावा आणि नागरिकांना या त्रासातून मुक्त करावे, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे