राजस्थानातील या मंदिरात चक्क 25 हजार उंदरांची पूजा का केली जाते ? जाणून घ्या या मंदिराची रहस्यमय कथा
राजस्थानच्या देशनोक येथील करणी माता मंदिरात हजारो उंदीरांची मनोभावे पूजा केली जाते. करणी माता मंदिरात उंदरांना दूध, मिठाई आणि इतर पदार्थांचा नैवेद्य अर्पण केला जातो. पांढरा उंदीर दिसणं भाविकांसाठी शुभ मानलं जातं, अशी धार्मिक मान्यता आहे.

राजस्थान म्हटलं की किल्ले, राजवाडे आणि वाळवंट आठवतं. पण याच राजस्थानात एक असं मंदिर आहे, जिथे देवतेसोबतच हजारो उंदीरांची पूजा केली जाते. मंदिराच्या परिसरात हे उंदीर मोकळेपणाने वावरतात, भाविकांच्या पायाजवळून जातात. त्यांच्यासाठी दूध आणि मिठाईचा नैवेद्य सुद्धा दाखवला जातो. नेमकी या मागची काय कथा आहे जाणून घ्या
हे मंदिर राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यातील देशनोक येथे आहे. बीकानेर शहरापासून हे ठिकाण सुमारे 30 किमी अंतरावर आहे. करणी माता मंदिर म्हणून प्रसिद्ध असलेल्या या मंदिराला जगभरात 'Rat Temple' म्हणून ओळखलं जातं
राजस्थान पर्यटन विभागाच्या माहितीनूसार या मंदिरात 25,000 हून अधिक उंदीर आहे. हे उंदीर मंदिराच्या भिंती, फरशी आणि वेगवेगळ्या कोपऱ्यांमध्ये सहजपणे फिरत असतात. अनेकवेळा भाविकांच्या पायाजवळूनही उड्या मारत असतात.
या उंदरांना "कब्बा" म्हणतात : या मंदिरात उंदाराला देव "कब्बा" म्हणून संबोधले जाते. करणी मातेच्या भक्तांशी आणि कुटुंबाशी त्यांचा संबंध असल्याची धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे मंदिरात त्यांना इजा करणं किंवा मारणं पाप समजलं जातं.
करणी माता आणि उंदराचा काय आहे संबंध : या संबंधामागे एक आख्यायिका सांगितली जाते. करणी मातेचा सावत्र मुलगा लक्ष्मण तलावात बुडून मरण पावला. त्यानंतर करणी मातेने यमदेवाकडे पुन्हा जीवंत करण्याची विनंती केली. त्यानुसार लक्ष्मणाला पुन्हा जीवनदान मिळालं आणि करणी मातेचा पुत्राने उंदराच्या रूपाने पुनर्जन्म मिळाला. अशी मान्यता आहे.
उंदरांना हा नैवेद्य अर्पण केला जातो : मंदिरात येणारे भाविक या उंदरांसाठी दूध, मिठाई आणि इतर पदार्थ अर्पण करतात. भक्तगण उंदरासोबत मंदिर परिसरात मोकळेपणाने फिरतात आणि त्यांना त्रास न देता आदराने वागवतात.
पांढरा उंदीर सर्वात पवित्र :मंदिरातील पांढरे उंदीर विशेष पवित्र मानले जातात. धार्मिक मान्यतेनुसार ते करणी माता आणि त्यांच्या मुलांचे रूप असल्याचं मानलं जातं. त्यामुळे एखाद्या भाविकाला पांढरा उंदीर दिसणं शुभ मानलं जातं.
दोनदा मोठी जत्रा भरतात : करणी माता मंदिरात वर्षातून दोनदा मोठी जत्रा भरते.चैत्र आणि आश्विन नवरात्राच्या काळात होणाऱ्या या यात्रेला मोठ्या संख्येने भाविक येतात.