सोनं खरेदी करताना सावधान, सोन्यात रेडियम पावडर मिसळला जातोय? बुलियन असोसिएशनचा दावा काय?
सोन्यात रेडियम पावडर मिसळल्याच्या सोशल मीडियावरील अफवा बुलियन असोसिएशनने फेटाळल्या आहेत. हॉलमार्किंग आणि एक्सआरएफ चाचणीद्वारे भेसळ ओळखता येते असे असोसिएशनने स्पष्ट केले. ग्राहकांनी विश्वसनीय विक्रेत्यांकडून हॉलमार्क असलेले सोने खरेदी करावे आणि पक्के बिल घ्यावे, असा सल्ला दिला आहे.

सोनं खरेदी करत असाल तर आताच सावध व्हा. सोन्यात रेडियम पावडर मिसळला जात असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे ग्राहकांची चिंता वाढली आहे. सोशल मीडियातून अशा पद्धतीने बातम्या येत आहेत. त्यावर बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने प्रतिक्रिया दिली आहे. सोन्यात अशा पद्धतीने होणारी भेसळ पकडणं शक्य नाही. त्यासाठी हॉलमार्किंग आणि एक्सआरएफ टेस्ट सारखे तपासणीचे अन्य पर्याय उपलब्ध आहेत, असं असोसिएशनने म्हटलं आहे.
बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे प्रमुख योगेश सिंघल यांनी IANS या वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियात पसरलेल्या बातमीमुळे ग्राहकांमध्ये विनाकारण भीती निर्माण झाली आहे. सोन्यात इतर धातूंची भेसळ होणं ही नवीन गोष्ट नाहीये. ज्वेलरी इंडस्ट्री अनेक दशकांपासून अशा शक्यतेचा सामना करत आली आहे, असं योगेश सिंघल यांनी सांगितलं.
भेसळ कशी पकडणार?
सोन्यात रेडियम पावडर मिसळला जात असेल तर तो हॉलमार्किंग आणि एक्सआरएफ टेस्टने पकडला जाऊ शकतो. देशातील विद्यमान तपास यंत्रणा अशा प्रकारची भेसळ शोधून काढण्यात सक्षम आहे, असं सिंघल यांनी स्पष्ट केलं.
एक्सआरएफ म्हणजे एक्स रे फ्लोरेन्सेस ही अशी एक टेक्निक आहे की जिच्याद्वारे कोणत्याही धातूमध्ये असलेले तत्त्व आणि त्याचे प्रमाण शोधून काढते. त्यामुळे सोन्याची शुद्धता आणि त्यात मिसळल्या गेलेल्या दुसऱ्या धातूची माहिती मिळू शकते.
सोन्यात दुसरे धातू मिसळल्याच्या शक्यता यापूर्वीही व्यक्त केल्या होत्या. गेल्या अनेक दशकांपासून इरिडियम, रुथेनियम आणि रेनियम आदी धातूंवरूनही सवाल केले गेले आहेत. असोसिएशनने वेळोवेळी अशा दाव्यांची तपासणी केली आहे. सध्याची व्यवस्था कशाप्रकारे भेसळ युक्त सोनं पकडू शकते हे आम्ही पाहिलं आहे, असं सिंघल यांनी म्हटलं आहे.
प्रयोग यशस्वी झाले नाही
सुरुवातीच्या काळात काही लोकांनी सोन्यामध्ये दुसरे धातू मिसळण्याचा प्रयत्न केला होता. पण काही धातूंना पिघळवण्यासाठी अधिक तापमानाची गरज असते. त्यामुळे हे प्रयोग यशस्वी होऊ शकले नाहीत, अशी माहितीही त्यांनी दिली.
असे काही धातू तस्करीच्या माध्यमातून देशात येतात. त्याचा वापर करून मोठ्या प्रमाणात सोन्यात भेसळ करणं आर्थिक दृष्ट्या फायद्याचं नाहीये. त्यामुळे सोन्यात भेसळ होण्याची शक्यता फार कमी आहे, असंही त्यांचं म्हणणं आहे.
सोनं खरेदी करताना लक्षात ठेवा…
नेहमी विश्वासू आणि प्रतिष्ठीत ज्वेलर्सकडे सोने खरेदी करा.
ज्वेलरी घेताना हॉलमार्क आणि त्याच्या शुद्धतेशी संबंधित माहितीची तपासणी करा.
खरेदी केल्यानंतर पक्कं बिल घ्या
सोशल मीडियावरील व्हायरल दाव्यांवर विश्वास ठेवण्याऐवजी अधिकृत तपासणी आणि प्रमाणन यावर विश्वास ठेवा.
विश्वासू दुकानदाराकडूनच सोने खरेदी करा आणि योग्य बिल घ्या, असा सल्ला योगेश सिंघल यांनी दिला आहे.
