Kavya-Anirudh: IPL टीमची मालकीण बनली रजनीकांत यांची सून; अनिरुद्ध-काव्याच्या लग्नातील न पाहिलेले फोटो
संगीतकार अनिरुद्ध रविचंदर आणि सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन यांच्या लग्नसोहळ्यातील खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. रजनीकांत आणि एम. के. स्टॅलिन यांच्यासह अनेक दिग्गजांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली होती.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय संगीतकार अनिरुद्ध रविचंदर आणि आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबाद संघाची सीईओ काव्या मारन यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ग्रीसमध्ये मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या शाही विवाहसोहळ्यात चित्रपट, राजकारण आणि क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गज सहभागी झाले होते. आता अनिरुद्धने लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांमधील काही खास आणि न पाहिलेले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये सुपरस्टार रजनीकांत आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्यासोबत नवदाम्पत्य दिसत आहे. त्यामुळे या फोटोंची सोशल मीडियावर विशेष चर्चा रंगली आहे. अनिरुद्धने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्याचे आणि काव्याचे अनेक सुंदर क्षण पाहायला मिळतात. एका फोटोत दोघेही रजनीकांत यांच्यासोबत पोज देताना दिसतात, तर दुसऱ्या फोटोत एम. के. स्टॅलिन यांच्यासोबत त्यांची खास भेट पाहायला मिळते. याशिवाय कुटुंबीयांसोबतचे फोटोही अनिरुद्धने शेअर केले आहेत.
या फोटोंसोबत त्याने, 'आमची मनं आनंदाने भरून गेली आहेत. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद आमच्यासाठी शब्दांपेक्षाही अधिक महत्त्वाचे आहेत. आमची नवी सुरुवात आणखी खास केल्याबद्दल धन्यवाद', अशा आशयाचं भावनिक कॅप्शन लिहिलं आहे. अनिरुद्धने याआधीही लग्नसोहळ्यातील काही खास फोटो शेअर केले होते. एका फोटोत तो काव्याला प्रेमाने मिठी मारताना दिसतो. तर दुसऱ्या फोटोत दोघेही हातात हात घालून पाहुण्यांच्या स्वागतादरम्यान प्रवेश करताना दिसतात.
विशेष म्हणजे, एका व्हिडीओमध्ये अनिरुद्ध स्टेजवर गाणं गाताना दिसतो आणि काव्याही त्याला साथ देताना दिसते. या सोहळ्यासाठी काव्याने पांढऱ्या आणि सोनेरी रंगाचा आकर्षक ड्रेस परिधान केला होता. तर अनिरुद्धने पांढऱ्या रंगाचा सूट निवडला होता. दुसऱ्या लूकमध्ये काव्या शॅम्पेन गोल्ड रंगाच्या गाऊनमध्ये दिसली. तिच्या या लूकचीही सोशल मीडियावर चर्चा झाली.
काव्या मारन ही सन ग्रुपचे अध्यक्ष कलानिधी मारन यांची मुलगी आहे. ती सन टीव्ही नेटवर्कची कार्यकारी संचालक असून सनरायझर्स हैदराबाद या आयपीएल संघाची सीईओदेखील आहे. आयपीएलच्या सामन्यांदरम्यान ती अनेकदा संघाला प्रोत्साहन देताना दिसते. दुसरीकडे, अनिरुद्ध हा भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय संगीतकार आहे. 'व्हाय दिस कोलावेरी डी' या गाण्यामुळे त्याला विशेष प्रसिद्धी मिळाली. आता या दोघांच्या लग्नातील फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.