
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कारवाई पथकाने बार मालकांनी केलेल्या वाढीव बांधकामांवर आज हातोडा चालवित बांधकाम तोडण्याची कारवाई केली.

कल्याण शीळ रस्त्याला सुमारे 40 हून अधिक बार आहेत. त्यामुळे मद्यपिंकडून या रस्त्याला बार रोडही संबोधले जाते. हे बार मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येतात.

मानपाडा पोलिसांनी बार मालकांनी केलेल्या वाढीव बांधकामाचा अहवाल तयार केला होता. हा अहवाल मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी केडीएमसीला देत कारवाईची मागणी केली होती.

मानपाडा पोलिसांनी केलेल्या अहवालानुसार 17 बार मालकांनी वाढीव बांधकाम केल्याचं समोर आलं होतं. त्यापैकी कल्याण शीळ रोडवरील टुरिस्ट, किंग , रसिला, कृष्णासाई या 4 बेकायदा बांधकाम केलेल्या बारवर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी कारवाई केली.

उर्वरीत बेकायदा बांधकाम केलेले बार हे अन्य प्रभागाच्या हद्दीत येतात. त्या प्रभागातील सहाय्यक आयुक्त ते तोडण्याची कारवाई करतील असे भारत पवार यांनी सांगितले.

बेकायदा बांधकाम कारवाई दरम्यान पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच जेसीबी, पोकलेनच्या सहाय्याने महापालिकेच्या कारवाई पथकाने ही कारवाई केली आहे.