
मुंबईतील केईएम रुग्णालयामध्ये मुंबई आणि मुंबईबाहेरुन मोठ्या संख्येने रुग्ण उपचारसाठी येत असतात. या केईएम रुग्णालयाला १०० वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने सर्व प्रवेशद्वारांवर नवीन गेट तयार करण्यात आले आहे.

मात्र या गेटवर लिहिलेला मजकूर इंग्रजी भाषेत असल्याने ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आले. केईएम रुग्णालयाच्या गेटला शिवसैनिकांनी काळं फासून आंदोलन केलं आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या केईएम हॉस्पिटलच्या शतकपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने सर्व प्रवेशद्वारांवर नवीन गेट तयार करण्यात आले होते. त्यावर केईएम प्रशासनाने इंग्रजीमध्ये लिहून मराठीचा अपमान केला, असे ठाकरे गटाचे म्हणणं आहे.

केईएम रुग्णालयाला १०० वर्ष पूर्ण झाल्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. १८ ते २२ जानेवारीदरम्यान हे कार्यक्रम पार पडले.

परदेशातील पाहुणे येणार आहेत असे सांगून इंग्रजीमध्ये करण्याचा हट्ट केईएम प्रशासनाचा होता. पण कार्यक्रम संपूनही दोन महिने झाले, तरी केईएम प्रशासनाने सदर इंग्रजीतील बोर्ड काढलेले नाहीत.

यामुळे ठाकरे गटाने केईएम रुग्णालयाच्या प्रशासनाला निवेदन दिले. तातडीने सदर इंग्रजी गेट काढा किंवा मराठी करा, असे या निवेदनात नमूद करण्यात आले.

मात्र याला एक महिना होऊन गेला तरी अद्याप कार्यवाही केलेली नाही. म्हणून शिवसेनेच्या वतीने आज आंदोलन करून सदर गेटला काळे फासण्यात आले.

मराठीत मजकूर नसल्याने शिवडी परळ येथील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी गेटला काळ फासले. रुग्णालय प्रशासनाला वारंवार सांगून देखील त्यांनी दुर्लक्ष केल्याने ठाकरे गटाकडून ही भूमिका घेण्यात आली.