‘कोई मिल गया’ फेम बिट्टू सरदार अडकला लग्नबंधनात; कोण आहे पत्नी?
हृतिक रोशनच्या ‘कोई मिल गया’ चित्रपटात बिट्टू सरदारची भूमिका साकारून लोकप्रिय झालेला बालकलाकार अनुज पंडित शर्मा आता विवाहबंधनात अडकला आहे. डॉ. प्रभज्योत चावलासोबत त्याने हिंदू आणि शीख पद्धतीने लग्नगाठ बांधली असून, त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.

बॉलिवूडमधील अनेक बालकलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे ‘कोई मिल गया’ चित्रपटातील बिट्टू सरदार. हृतिक रोशनचा लहानगा मित्र म्हणून प्रेक्षकांच्या लक्षात राहिलेला हा बिट्टू आता मोठा झाला असून त्याच्या आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. अभिनेता अनुज पंडित शर्मा याने नुकताच डॉ. प्रभज्योत चावला हिच्यासोबत विवाह केला आहे.
अनुजने स्वतःच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लग्नसोहळ्यातील काही खास फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये त्याचा आनंद ओसंडून वाहताना दिसत आहे. लग्नासाठी अनुजने ऑफ व्हाइट रंगाची सुंदर एम्ब्रॉयडरी असलेली शेरवानी परिधान केली होती. या पारंपरिक लूकमध्ये तो एखाद्या राजकुमाराप्रमाणे दिसत होता. तर त्याची पत्नी डॉ. प्रभज्योत चावला लाल रंगाच्या आकर्षक लेहंग्यात अतिशय सुंदर दिसत होती.
अनुज आणि प्रभज्योत यांचा विवाह हिंदू तसेच शीख परंपरेनुसार पार पडल्याचं लग्नाच्या फोटोंमधून दिसून येत आहे. एका बाजूला मंडपातील पारंपरिक विवाहविधी, तर दुसरीकडे गुरुद्वारामधील आनंद कारज सोहळ्याचे क्षणही अनुजने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. दोघांनी कुटुंबीय आणि जवळच्या लोकांच्या उपस्थितीत आयुष्याची नवी सुरुवात केली.
अनुजची पत्नी डॉ. प्रभज्योत चावला ही हेल्थ अँड वेलनेस क्षेत्राशी संबंधित आहे. तिच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलनुसार, ती एका हेल्थ अँड वेलनेस वेबसाइटची संस्थापक आहे. अनुजने लग्नाच्या फोटोंमध्ये तिला टॅग केलं असून, दोघांचे एकत्रित फोटोही सोशल मीडियावर पाहायला मिळतात.
अनुज पंडित शर्माला खरी लोकप्रियता 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कोई मिल गया’ या चित्रपटामुळे मिळाली. चित्रपटात हृतिकने साकारलेल्या रोहितचा मित्र बिट्टू सरदार ही व्यक्तिरेखा अनुजने साकारली होती. त्याच्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आजही अनेक चाहते त्याला बिट्टू याच नावाने ओळखतात. या चित्रपटानंतर अनुजने अभिनय क्षेत्रात काम सुरूच ठेवलं. ‘डरना मना है’, ‘से सलाम इंडिया’ आणि ‘टोटल सियाप्पा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये तो दिसला.