‘लापता लेडीज’मधील अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी? रडत-रडत शेअर केला व्हिडीओ

'लापता लेडीज' फेम अभिनेता सतेंद्र सोनीचा भावनिक व्हिडिओ व्हायरल; मानधन न मिळाल्याचा आरोप, कोण आहे तो दिग्दर्शक?.

लापता लेडीजमधील अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी? रडत-रडत शेअर केला व्हिडीओ
Image Credit source: Social media
| Updated on: Jun 28, 2026 | 11:10 AM

किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ या चित्रपटातून ओळख मिळवलेले अभिनेता सतेंद्र सोनी सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर त्याचा एक भावनिक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यामध्ये तो अत्यंत घाबरलेला आणि व्यथित अवस्थेत दिसत आहे. या व्हिडिओनंतर त्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

सतेंद्र सोनीने त्याच्या फेसबुक अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करत स्वतःसोबत घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्याच्या म्हणण्यानुसार, मध्य प्रदेशातील मैहर येथे ‘पेट पालकी’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी त्याला बोलावण्यात आले होते. त्याने सलग आठ दिवस प्रामाणिकपणे शूटिंग पूर्ण केले. मात्र काम संपल्यानंतर निर्मात्याने त्याच्या मेहनतान्याचे पैसे देण्यास नकार दिल्याचा गंभीर आरोप त्याने केला आहे.

शेअर केला भावनिक व्हिडीओ

व्हिडिओमध्ये सतेंद्र सोनी रडत-रडत सांगतो आहे की, जेव्हा त्याने आपल्या कामाचे मानधन मागितले, तेव्हा पैसे देण्याऐवजी त्याला धमकावण्यात आले. या प्रकारामुळे तो मानसिकदृष्ट्या खूप अस्वस्थ झाल्याचेही त्याने सांगितले. त्याच्या या भावनिक व्हिडिओमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली असून, अनेकांनी छोट्या आणि नवोदित कलाकारांशी होणाऱ्या अशा वागणुकीवर संताप व्यक्त केला आहे.

अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी कलाकारांच्या मेहनतीचे योग्य मूल्य दिले गेले पाहिजे, अशी मागणी केली आहे. चित्रपटसृष्टीत नवोदित कलाकारांना अशा प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही अनेकांनी नमूद केले आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाबाबत अद्याप कोणत्याही अधिकृत यंत्रणेने किंवा संबंधित चित्रपट निर्मात्यांकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे सतेंद्र सोनी यांनी केलेल्या आरोपांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.

या घटनेनंतर चाहत्यांची चिंता वाढली असतानाच सतेंद्र सोनीने आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडिओमध्ये तो रेल्वे स्थानकावर दिसत असून त्याच्या सोबत आणखी दोन व्यक्ती आहेत. त्यानी इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ पोस्ट करत लिहिले, आम्ही मुंबईत सुरक्षित पोहोचलो आहोत. आम्हाला मदत करणाऱ्या मैहर (मध्य प्रदेश) पोलिसांचे आणि साथ देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.या पोस्टनंतर त्याच्या चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला असून, अनेकांनी त्याना धीर देणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Follow Us