
दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईतील गणपती विसर्जन सोहळा मोठ्या थाटामाटात सुरु आहे. त्यातच असंख्य लोकांचे श्रद्घास्थान असलेल्या लालबागचा राजा गणपती विसर्जन सोहळ्याला सुरुवात झाली आहे. लालबागचा राजाला निरोप देण्यासाठी भक्तांचा जनसागर उसळला आहे.

सध्या लालबागच्या राजाची शाही मिरवणूक सुरू झाली आहे. लालबागचा राजा आपल्या भव्य कमानीतून बाहेर पडल्यानंतर 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची' अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

दिमाख ऐसा निराळा, शानही तुझी रे न्यारी, उधळीत गुलाल आभाळी, रंगली गणेश नगरी, ढोल ताशाचा नाद निनादला, आला रे लालबागचा राजा... या गाण्याच्या ओळीप्रमाणेच सध्या लालबागमधील वातावरण पाहायला मिळत आहे.

लालबागच्या राजाची मूर्ती मंडपातून बाहेर येतानाचे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. यावेळी फुलांचे आणि नोटांचे भव्य हार बाप्पाला अर्पण करण्यात आले होते. ज्यामुळे बाप्पाची छबी अधिकच मनमोहक दिसत होती.

लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी आणि त्याला अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो भाविकांनी मंडपाभोवती गर्दी केली होती. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या जयघोषाने अवघा परिसर दुमदुमून गेला.

यावेळी ढोल-ताशांचा गजर आणि गुलालाची उधळण करण्यात आली. त्यामुळे वातावरणात एक नवचैतन्य पाहायला मिळाले. आपल्या लाडक्या लालबाग राजाला निरोप देताना मंडळाचे कार्यकर्ते आणि अनेक भक्त भावूक झाले होते.

या वर्षीच्या मिरवणुकीत एक अतिशय महत्त्वाचा क्षण पाहायला मिळाला. लालबागच्या राजा कमानीतून बाहेर येताच मंडळातर्फे भारतीय सैन्य दलाला मानवंदना देण्यात आली. यावेळी तिरंगा फडकवून देशभक्तीपर गाणीही वाजवण्यात आली.

त्यासोबतच घराघरातून सैन्य दलात सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढायला हवी असा संदेश यावेळी देण्यात आला. यावेळी तिरंगी रंगाचा पेपर ब्लास्टही करण्यात आला. तसेच मोठ्या प्रमाणात गुलालाची उधळण यावेळी करण्यात आली.

लालबागचा राजा आता विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. लालबागच्या राजाची ही भव्य विसर्जन मिरवणूक आता पुढील १७-१८ तास चालणार आहे.

लालबाग राजाचे विसर्जन हे गिरगाव चौपाटीवर केले जाणार आहे. यावेळी रस्त्यात ठिकठिकाणी बाप्पाचे स्वागत करण्यासाठी हजारो भाविक उभे असल्याचे पाहायला मिळत आहे. उद्या पहाटेपर्यंत बाप्पा गिरगाव चौपाटीवर पोहोचेल. यानंतर त्याला भावपूर्ण निरोप दिला जाईल.